काेल्हापूर : अवसायन प्रक्रियेत सहायक निबंधक कृष्णा ठाकरे यांनी पात्र, अपात्र ठरवलेल्या दूध संस्था पुन्हा न्यायालयीन कचाट्यात सापडणार आहेत. हनुमान दूध संस्थेच्या अवसायनाच्या आदेशास न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे अपात्र ठरलेल्या अन्य ६४३ दूध संस्थांकडूनही न्यायालयात धाव घेण्याच्या हालचाली सुरू आहेत, तर पात्र ठरलेल्या ४०९ दूध संस्थांच्या विरोधात तक्रारदार प्रकाश बेलवाडेही याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रियाच पुन्हा न्यायालयीन सुनावणीच्या फेर्यात अडकण्याची शक्यता आहे.
अवसायनातील १,३२० दूध संस्थांपैकी सहायक निबंधक कृष्णा ठाकरे यांनी ६४४ दूध संस्थांचा अवसायनाचा आदेश कायम ठेवला. संबंधित संस्थांवर अवसायकांची नियुक्ती केली; मात्र ठाकरेंच्या निर्णयाला फणसवाडी (ता. भुदरगड) येथील हनुमान दूध संस्थेने न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने ठाकरे यांच्या आदेशाला स्थगिती दिली.
स्थगितीबाबात विधीतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणार
सहायक निबंधक यांनी दिलेल्या निर्णया विरोधात प्रथम उपनिबंधक, सहनिबंधक, संबंधित खात्याचे मंत्री यांच्याकडे प्रथम दाद मागायची. येथे न्याय न मिळाल्यास मग न्यायालयात जाण्याची प्रक्रिया आहे; मात्र सहायक निबंधकांच्या निर्णयाविरोधात ही प्रक्रिया पूर्ण न करताच हनुमान दूध संस्थेने न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या आदेशाला न्यायालयाने स्थगितीही दिली. त्यामुळे यासंदर्भात विधीतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन पुढील भूमिका घेणार असल्याचे तक्रारदार प्रकाश बेलवाडे यांनी सांगितले.
हनुमान दूध संस्थेला पाठविणार ठराव
हनुमान दूध संस्थेला सहायक निबंधकांनी अवसायनाचा दिलेला आदेश मंगळवारी कोल्हापूर सर्किट बेंचने स्थगित केला. त्यानुसार हनुमान दूध संस्था गोकुळ निवडणुकीसाठी पात्र ठरणार आहे. त्यामुळे न्यायालयाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर सहायक निबंधक कार्यालयाकडून हनुमान दूध संस्थेला ठराव पाठविला जाणार आहे.
तक्रारदार बेलवाडेंकडूनही याचिका
सहायक निबंधक ठाकरे यांनी पात्र ठरवलेल्या ४०९ दूध संस्थांबाबतची माहिती तक्रारदार प्रकाश बेलवाडे यांनी
मंगळवारी (दि.२३) घेतली. या संस्थांबाबत ठाकरे
यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात बेलवाडेही न्यायालयात
याचिका दाखल करणार आहेत.
राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस न्यायालयात जाणार
अवसायनातील बहुतांश संस्था या राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस पक्षाशी संबंधित आहेत. त्यामुळे आ. सतेज पाटील गट पुढील दोन दिवसांत अवसायनात गेलेल्या दूध संस्थांच्या वतीने याचिका दाखल करणार आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनाही न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे.