Rain Alert | कोल्हापूरसह राज्यातील 9 जिल्ह्यांत आज, उद्या हलक्या पावसाची शक्यता (संग्रहित छायाचित्र)
कोल्हापूर

Rain Alert | कोल्हापूरसह राज्यातील 9 जिल्ह्यांत आज, उद्या हलक्या पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरातील ‘90 बी’ प्रणालीमुळे राज्यात ढगाळ वातावरण

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या प्रणाली (90बी) मुळे महाराष्ट्रसह गोव्यात सोमवारी (दि. 12) व मंगळवारी (दि. 13) पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, पुणे, अहिल्यानगर, संभाजीनगर, बीड आणि नांदेड या भागांत ढगाळ वातावरणासह अधूनमधून पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.

90बी ही कोणतीही अधिकृत वादळाची प्रणाली नाही. हवामान निरीक्षणासाठी वापरली जाणारी तात्पुरती ओळख आहे. ती मुख्यतः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रासाठी वापरली जाते. पुढील काही दिवस या प्रणालीमधून मोठ्या प्रमाणावर आर्द्रता उत्तरेकडे सरकणार असल्याने, राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहील. परिणामी, सोमवारपासून किमान तापमानात वाढ होऊन पारा 16 ते 20 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईतही तुरळक पावसाची शक्यता

मुंबईतही तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः रायगड, पनवेल, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली परिसरात पावसाची शक्यता तुलनेने अधिक आहे. मुंबई शहरात पावसाची शक्यता कमी असली, तरी एखादी हलकी सर नाकारता येत नाही, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कोल्हापुरात पावसाचा हलका शिडकाव

गेल्या दोन महिन्यांपासून कोल्हापुरात थंडीचा कडाका जाणवत आहे. मात्र, ऐन थंडीत रविवारी कमालीचे वातावरणीय बदल पाहायला मिळाले. शहराच्या काही भागात तसेच कागल तालुक्यातील वंदूर येथे पावसाचा हलका शिडकाव झाला. दरम्यान, किमान तापमान 15 अंशांवर होते. परिणामी, थंडीचा कडाकादेखील कायम होता. सोमवारी (दि. 12) ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या शिडकावाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम आहे. रविवारीदेखील पहाटे कमालीचा गारठा होता. दुपारपर्यंत उन्हाचा तडाखा त्यानंतर अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले. ढगाळ वातावरणामुळे सापेक्ष आर्द्रता 58 टक्यांपर्यंत वाढली होती. सायंकाळी शहराच्या काही भागात पावसाचा हलका शिडकाव झाला, तर कागल तालुक्यातील वंदूर येथे हलक्या सरी कोसळल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT