पेठवडगाव : येथील साळी गल्ली परिसरात जुन्या वादातून एका युवकावर एडक्याने जीवघेणा हल्ला केला. यात रतन आप्पासो पाटोळे (वय 25, रा. पेठवडगाव) जखमी झाला आहे. वडगाव पोलिसांनी सागर राजेंद्र खोत (20, रा. साळी गल्ली) आणि आयुब मेहबूब सरकावस (वय 22, रा. पेठवडगाव) यांना अटक केली. न्यायालयाने दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांच्या प्रभागातील उमेदवार विजयी झाल्याने गल्लीत फटाके उडविण्यात आले होते. हे फटाके रतनच्या सांगण्यावरून उडविले, असा गैरसमज सागर खोतने करून घेतला. याच कारणावरून त्याने रतनला शिवीगाळ व मारहाण केली होती. त्याबाबत रतनने वडगाव पोलिसांत तक्रारही दिली होती. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास सागर खोतने मित्र आयुब सरकावस यांच्या मदतीने रतनवर हल्ला केला. यात रतन गंभीर जखमी झाला. त्याला वडगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक हर्षल बागल करत आहेत.
इन्स्टाग्रामवरील स्टेटस्ची चर्चा
रतन पाटोळे याच्यावर हल्ला करण्यापूर्वी संशयित आयुब सरकावस याने इन्स्टाग्रामवर एडक्याला धार लावत असल्याचा फोटो असलेला खुन्नस देणारा स्टेटस् टाकल्याची माहिती पुढे आली असून, त्याची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.