Kalamba Jail | कळंबा कारागृहाच्या तुरुंग अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला 
कोल्हापूर

Kalamba Jail | कळंबा कारागृहाच्या तुरुंग अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला

मोकातील सहा गुन्हेगारांवर जुना राजवाड्यात गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : तू लय नियमात वागतोस, शांत राहा, नाहीतर बाहेर गेल्यावर तुला आम्ही सोडणार नाही, अशी धमकी देत मोकातील सहा आरोपींनी वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्यावर कळंबा कारागृहातील केबीनमध्ये घुसून दगडाने जीवघेणा हल्ला केला. बुधवारी (दि.१६) सकाळी ९ च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे कारागृहात खळबळ उडाली. जखमी तुरुंगाधिकारी प्रकाश फुन्नू चव्हाण (वय ५०, रा. साळोखेनगर, कोल्हापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अल्ताफ शरीफ, भारत राजू शेट्टी, विनायक संभाजी चौगुले, आशुतोष संतोष वर्तले, आदम मोहम्मद मुजावर, शाहिद मन्सुर यांच्यावर गुन्हा दाखल केला.

कळंबा कारागृहातील सर्कल १ मधील बॅरेक ३, ४ मध्ये संशयित सोमवारी दुपारी दंगा करत होते. यावेळी वरिष्ठ तुरुंगाधिकारी प्रकाश चव्हाण यांनी संशयितांना कारागृहाची शिस्त मोडू नका, असे दरडावले होते. याचाच राग मनात धरून बुधवारी मोक्यातील बंदी संशयितांनी गुरुवारी दुपारी चव्हाण यांच्या केबिनमध्ये घुसून त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच अल्ताफ शरीफने चव्हाण यांच्या डोक्यात दगडाने हल्ला केला. यामध्ये चव्हाण जखमी झाले. यावेळी कर्मचाऱ्यांनी हल्लेखोरांना ताब्यात घेतले. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक पडवळ तपास करीत आहेत.

तुरुंग अधिकाऱ्यावर हल्ला; सहा कैद्यांची रवानगी अन्य कारागृहांत

कळंबा कारागृहातील वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्यास केबीनमध्ये घुसून मारहाण करणाऱ्या ‘मोका’तील सहा कैद्यांना अन्य जेलमध्ये हलविण्याचा प्रस्ताव कारागृह प्रशासनाने तयार केला आहे. हा प्रस्ताव गुरुवारी कारागृह महानिरीक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. सुरक्षेच्या कारणास्ताव या सहा कैद्यांना बुधवारीच स्वतंत्र बॅरेकमध्ये स्थलांतरित करण्यात आले.

कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या बॅरेकमध्ये दंगा करणाऱ्या अल्ताफ शरीफ, भारत राजू शेट्टी, विनायक संभाजी चौगुले, आशुतोष संतोष वर्तले, आदम मोहम्मद मुजावर, शाहिद मन्सुर (सर्व रा. कळंबा जेल) यांना वरिष्ठ तुरुंग अधिकारी प्रकाश चव्हाण यांनी दरडावले होते. याचाच राग मनात धरून बुधवारी चव्हाण यांना मारहाण केली होती. या प्रकरणी कारागृह प्रशासनाने या सहा कैद्यांना अमरावती, नागपूर, येरवडा या ठिकाणी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. याचा प्रस्ताव कारागृह अधीक्षक नागनाथ सावंत यांनी तयार केला असून, गुरुवारी कारागृह महानिरीक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. दोन दिवसांत या प्रस्तावास मंजुरी मिळणार असून, सहाही कैद्यांना स्थलांतरित केले जाणार आहे.

दरम्यान, या सहा जणांवर सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला, सरकारी कामात अडथळा असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. न्यायालयातून परवानगी घेवून त्यांना अटक करणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांनी दिली. या सहा जणांनी कट रचून हा हल्ला केला काय, याचीही चौकशी होणार आहे. गेल्या चार दिवसांमधील सीसीटीव्ही फुटेज जुना राजवाडा पोलिस ताब्यात घेणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT