कोल्हापूर : भारतीय लष्करातील शौर्य, नेतृत्व आणि पराक्रमाचे प्रतीक ठरलेले कोल्हापूरच्या मातीतील सुपुत्र कीर्ती चक्र, निवृत्त डी. एस. ओ., पद्मश्री लेफ्टनंट जनरल एस. पी. पी. थोरात यांच्या ‘माझी शिपाईगिरी’ या आत्मचरित्राच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन रविवार, दि. 12 रोजी शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के व निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे यांच्या हस्ते आयोजित केले आहे.
दसरा चौक येथील शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती डॉ. यशवंत थोरात आणि उषा थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आर. ए. तथा बाळ पाटणकर, अनिल मेहता उपस्थित होते.
यशवंत थोरात म्हणाले, 1985 मध्ये वडिलांनी इंग्रजी भाषेतून आत्मकथा पुस्तकरूपातून मांडली. मात्र त्यांची इच्छा होती की आत्मकथा मराठीतही प्रकाशित व्हावी. 1962 च्या चीन युद्धापूर्वी आणि नंतरच्या घटनांमधील भारतीय लष्कराची भूमिका लोकांपर्यंत विशेषत: मराठी वाचकांपर्यंत पोहोचवायची होती. यासाठी डी. व्ही. गोखले यांनी पुढाकार घेतला आणि इंग्रजी भाषेतील पुस्तकाचे ‘माझी शिपाईगिरी’ या नावाने मराठी भाषांतर झाले. यामध्ये मेहता प्रकाशनच्या अनिल मेहता यांची साथ मिळाली. या पुस्तकात जनरल थोरात यांच्या 37 वर्षांच्या लष्करी प्रवासाचे दर्शन घडवणारे अप्रकाशित लेख, छायाचित्रे आणि वैयक्तिक कागदपत्रे समाविष्ट केली आहेत. माझी पत्नी उषा यांनी सर्व सामग्रीचे संकलन करून जनरल थोरात यांच्या आयुष्य व कार्यावर आधारित प्रदर्शनाची कल्पना मांडली आणि त्याची सर्व जबाबदारी घेतली. उषा यांच्या पुढाकाराने प्रदर्शनाचे दालन साकारले आहे.
या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने लेफ्टनंट जनरल थोरात यांच्या स्मृती जपणार्या वस्तू, शौर्यपदके, स्मृतिचिन्हे आणि छायाचित्रांचे दोन दिवसीय प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे. या दालनात थोरात यांच्याशी संबंधित 61 वस्तू मांडण्यात येणार आहेत. त्यांच्यासोबत नेहमी असलेल्या रेडिओपासून पिस्तुल, तलवार अशा वैशिष्ट्यपूर्ण वस्तू पाहायला मिळणार आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन टीए मराठा बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल बी. के. कुल्लोळी यांच्या हस्ते शनिवारी (दि. 11) सकाळी 11 वाजता शाहू स्मारक भवन येथील कला दालनात होणार आहे. निवृत्त कर्नल विजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली जयकुमार देसाई यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. रविवार, दि. 12 पर्यंत रात्री आठ वाजेपर्यंत प्रदर्शन सुरू राहणार आहे.
लष्करी इतिहास, शौर्यगाथा आणि देशसेवकांच्या स्मृती जपण्याची आवड असलेल्या नागरिकांसाठी थोरात यांच्या वापरातील तसेच संग्रहातील वस्तूंचे प्रदर्शन एक दुर्मीळ आणि प्रेरणादायी संधी ठरणार आहे. प्रत्येक वस्तूशी जोडलेला संदर्भ, आठवण, किस्सा अनुभवता येणार आहे. लष्करातील अभिमानास्पद योगदान आणि कोल्हापूरचा लौकिक वाढविणार्या लेफ्टनंट जनरल एस. पी. पी. थोरात यांच्या कार्याचे स्मरण या सोहळ्यातून पुन्हा उजळले जाणार आहे, अशा भावना थोरात यांच्या स्नुषा उषा थोरात यांनी व्यक्त केल्या.