कोल्हापूर : महापालिकेतील बैठकीत बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर. शेजारी आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, उपमहापौर अक्षय जरग व इतर.   (छाया : मिलन मकानदार)
कोल्हापूर

Rajesh Kshirsagar | कायदा अन् व्यवहाराची सांगड घालून फेरीवाल्यांना व्यवसाय करूद्या : आ. राजेश क्षीरसागर

५,८०० फेरीवाल्यांसाठी झोन निश्चित करा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : फेरीवाला हा समाजाची गरज आहे. कोल्हापुरात ५ हजार ८०० बायोमेट्रिक कार्ड असलेले फेरीवाले असून कायदा-व्यवहाराची सांगड घालून त्यांना व्यवसाय करूद्या; पण एकाच फेरीवाल्याने तीन-चार गाड्या लावू नयेत. फेरीवाल्यांनी शिस्त पाळणे आवश्यक आहे. प्रशासनाने तत्काळ फेरीवाला झोन निश्चित करावेत. तसेच, न्यायालयाच्या सूचनांचा अ‍वमान होईल असे काहीही करू नका, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांनी आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांना केल्या. दरम्यान, आयुक्तांनी फेरीवाल्यांबाबत दोन दिवसांत निर्णय घेऊ, असे सांगितले. उपमहापौर अक्षय जरग प्रमुख उपस्थित होते.

फेरीवाल्यांना डिजिटल सर्टिफिकेट

प्रशासकीय अनागोंदीमुळेच शहरातील फेरीवाल्यांचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगून आयुक्त डॉ. भारूड म्हणाले, बायोमेट्रिक कार्ड असलेल्या फेरीवाल्यांचे आयुष्यभर त्यांनी भीती न बाळगता व्यवसाय करावा, असे व्यवस्थित नियोजन करण्यात येत आहे. सर्वांना क्यूआर कोड असलेले डिजिटल सर्टिफिकेट दिले जाणार आहे. त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणासह सर्व नोंदी असतील. प्रत्येक फेरीवाल्याकडून रोज १०० रु. घेतले जातील. महासभेत ठराव करून समिती केली जाईल. त्यानंतर तत्काळ झोन निश्चितची प्रक्रिया करण्यात येईल. पूर्वीच्याच ठिकाणी हातगाडी लावणार हा हट्ट फेरीवाल्यांनी करू नये.

वाहने चालतात; पण फेरीवाले अडथळा...

कॉ. दिलीप पवार म्हणाले, रस्त्यावर गाड्या महापालिकेला अडथळा ठरत नाहीत; पण पोटापाण्यासाठी राबणारा फेरीवाला अडथळा ठरतो. महापालिकेचे वकील न्यायालयात फेरीवाल्यांची बाजू मांडत नाहीत. प्रशासन कायद्याचे पालन करत नाही. नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी महापालिका परिसरातील बायोमेट्रिक कार्ड असलेल्या १४ फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी, अशी सूचना केली. नगरसेवक आदिल फरास यांनी अधिकारी गुंडासारखे वागत असून दहशत निर्माण करत आहेत. सरसकट कारवाई करणे चुकीचे आहे, असे सांगितले.

...तर मुलाबाळांसह महापालिकेला घेराव

माजी महापौर नंदकुमार वळंजू म्हणाले, नियमानुसार फेरीवाल्यांचा पाच वर्षांतून एकदा सर्व्हे करावा लागतो. परंतु, आता सहा वर्षे झाली आहेत. पुन्हा सर्व्हे करणे आवश्यक आहे. न्यायालयाने फेरीवाल्यांना हटविण्याचा कोणताही निर्णय दिलेला नाही. रंकाळा परिसरातील बायोमेट्रिक कार्ड असलेल्या ६० फेरीवाल्यांना अन्यायकारक हटविले. कमिटी स्थापन होऊन झोन निश्चित होईपर्यंत कारवाई करू नये; अन्यथा फेरीवाले मुलाबाळांंसह महापालिकेला घेराव घालतील, असा इशाराही वळंजू यांनी प्रशासनाला दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT