कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : ऐन सणासुदीत कोल्हापूर शहरातील बी, सी, डी व ई वॉडमधील बालिंगा योजनेवर अवलंबून असलेल्या भागात शनिवारपासून (दि. 14) दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. जिल्ह्यातील धरण क्षेत्रात यंदा पाऊस कमी झाला आहे. दिवसेंदिवस नदीतील पाण्याची पातळीही कमी होत आहे. भविष्यातील पाणीटंचाई विचारात घेता शहराला योग्य दाबाने पुरेसा पुरवठा होण्यासाठी दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
शहरातील आझाद गल्ली, मटण मार्केट, लक्ष्मीपुरी परिसर, शाहूपुरी 5, 6, 7 व 8 वी गल्ली, कामगार चाळ, सुभाष रोड, चांदणी चौक, रविवार पेठ, सुतारवाडा, खानविलकर पेट्रोल पंप, अकबर मोहल्ला, साळी गल्ली, महाराणा प्रताप चौक, शाहूपुरी कुंभार गल्ली, बाराइमाम परिसर, भवानी मंडप परिसर, सबजेल परिसर, मिरजकर तिकटी, महालक्ष्मी नगर, टेंबे रोड, सावित्रीबाई फुले दवाखाना परिसर या भागात शनिवारपासून (दि. 14) एक दिवस आड पाणीपुरवठा होणार आहे.
महाद्वार रोड, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, निवृत्ती चौक, उभा मारुती चौक, ब्रह्मेश्वर बाग, तटाकडील तालीम, चंद्रेश्वर, संध्यामठ, फुलेवाडी, रंकाळा टॉवर, शिवाजी पेठ काही भाग, गुजरी, दत्त गल्ली, लक्ष्मी गल्ली, गंगावेश, दुधाळी, पंचगंगा रोड, लोणार चौक,
पापाची तिकटी, बुरुड गल्ली, सोन्या मारुती चौक, शिपुगडे तालीम, पिवळा वाडा, डोर्ले कॉर्नर, सिद्धार्थनगर, ब्रह्मपुरी, उत्तरेश्वर, लक्षतीर्थ वसाहत, बलराम कॉलनी या भागात रविवारपासून (दि. 15) एक दिवस आड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या भागातील नागरिकांनी उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले
गतवर्षीपेक्षा जादा साठा, तरीही पाणी कपात का?
कोल्हापूर शहराला राधानगरी धरणातून पाणीपुरवठा होतो. राधानगरी धरणात गुरुवारी सकाळी सात वाजता 8.28 टीएमसी पाणीसाठा आहे. धरणात 99.03 टक्के पाणी आहे. गतवर्षी याच दिवशी (दि. 12 ऑक्टोबर 2022) धरणात 8.17 टीएमसी पाणीसाठा होता. त्यावेळी धरण 98 टक्के भरलेले होते. गतवर्षीपेक्षाही आजअखेर धरणात जादा पाणीसाठा असूनही शहरात पाणी कपात का केली जाते, असा सवाल शहरवासीयांतून केला जात आहे.