तुर्केवाडी, माडवळे, जंगमहट्टी शिवारात बिबट्यासह दोन बछड्यांचे आगमन 
कोल्हापूर

Leopard Sighting : तुर्केवाडी, माडवळे, जंगमहट्टी शिवारात बिबट्यासह दोन बछड्यांचे आगमन

शेतकऱ्यांसह मजुरांमध्ये भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

चंदगड: वेंगुर्ला-बेळगाव राज्यमार्गापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तुर्केवाडी, जंगमहट्टी आणि माडवळे परिसरात बिबट्यासह दोन पूर्ण वाढ झालेल्या बछड्यांचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली आहे. सध्या काजू बागांच्या साफसफाईचा हंगाम सुरू असतानाच बिबट्या दिसल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने शेतकरी आणि मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनरक्षक विशाखा बास्कर व वन्यजीव बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पायांचे ठसे घेतले असता सदर ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तुर्केवाडी या गावाजवळ बुधवारी (दि. २५) सायंकाळी सव्वा पाच वाजता सावळ्याचे माळ या नावाच्या शेतात वंदना विलास बसर्गेकर या शेतकरी महिलेला पूर्ण वाढ झालेले दोन बछडे दिसले. तर सोमवारी त्याच गावातील रमेश चव्हाण या शेतकऱ्यालाही बिबट्याचे दर्शन झाले. परिसरातील शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन हजगोळी वनरक्षक विशाखा बास्कर यांनी केले आहे.

बुधवारी सायंकाळी दर्शन झाल्यानंतर शिवारातील अन्य शेतमजुरांना याची माहिती दिल्यानंतर सर्व शेतमजुरानी घाईगडबडीने आपले घर गाठले. मंगळवारी नारायण निंगो पाटील यांच्या पत्नी जंगमहट्टी या गावाजवळ येरमाळ नावाच्या शेतात मोठ्या बिबट्याचे दर्शन झाले. दोन दिवसापासून एका ठिकाणी बिबट्या तर एका ठिकाणी दोन पूर्ण वाढ झालेले बछडे दिसत आहेत. जंगमहट्टी, माडवळे या गावांच्या शिवाराला लागून पुढे तिलारी, कळसगादे हे महाराष्ट्रातील जंगल क्षेत्र तर धामणे हे कर्नाटकातील जंगल क्षेत्र लागून आहे. त्या परिसरातील बिबट्या व बछडे इकडे शिवारात आले असावेत, अशी शक्यता वनखात्याने वर्तवली आहे. पण काही शेतकरी पट्टेरी वाघ असल्याचे सांगत असल्याने गुरुवारी सकाळी पुन्हा सदर प्राण्यांच्या पायांचे ठसे घेणार असल्याचे विशाखा बास्कर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT