चंदगड : चंदगडच्या वेशीवर अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या देसाईवाडी परिसरात दोन दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. दोन दिवसांत एका पाळीव कुत्र्याचा फडशा पाडणार्या या बिबट्याचा वावर वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेर्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे शहरासह ग्रामीण भागात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
बुधवारी (दि. 17) नामदेव ओऊळकर आणि रवींद्र कसेबले यांच्या शेतातील शेडवर राखणीसाठी बांधलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला आणि त्याच्या शरीराचा अर्धा भाग खाल्ला होता. तर, गुरुवारी (दि. 18) सायंकाळी सहाच्या सुमारास बिबट्याने पुन्हा त्याच ठिकाणी येत कुत्र्याचा उरलेला भाग फस्त केला. शुक्रवारी (दि. 19) वनपाल कृष्णा डेळेकर यांनी शेडमध्ये लावलेल्या ट्रॅप कॅमेर्याची तपासणी केली असता, त्यात पूर्ण वाढ झालेला बिबट्या स्पष्टपणे कैद झाला आहे.
पोल्ट्री फार्ममुळे बिबट्याचा शिरकाव?
देसाईवाडी परिसरात दोन पोल्ट्री फार्म आहेत. येथील मृत कोंबड्या उघड्यावर टाकल्या जात असल्याने तिथे कुत्र्यांचा वावर वाढला होता. याच कुत्र्यांच्या शिकारीच्या शोधात बिबट्या या वस्तीपर्यंत पोहोचला असावा, असा अंदाज वनपाल कृष्णा डेळेकर यांनी व्यक्त केला आहे. मृत कोंबड्यांची उघड्यावर विल्हेवाट लावणार्या पोल्ट्रीचालकांना आता वन विभागातर्फे नोटिसा बजावण्यात येणार आहेत.
प्रशासनाचे आवाहन
चंदगडच्या इतिहासात पहिल्यांदाच शहराच्या इतक्या जवळ बिबट्याचा वावर दिसून आल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.