Panhala taluka Jakhale village leopard sighting
कासारवाडी : पन्हाळा तालुक्यातील जाखले गावात बिबट्याच्या वावराने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. गावालगत असलेल्या हजारे-गायकवाड मळा परिसरात सोमवारी रात्री बिबट्याने कुत्र्याची शिकार केली आणि ती शिकार झाडावर लटकवून ठेवली. ही घटना मंगळवारी (दि.५) सकाळी स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, बहिरेवाडी गावाच्या दक्षिणेस असलेल्या जाखले येथील हजारे-गायकवाड मळा परिसरात सोमवारी रात्री बिबट्याने कुत्र्याची शिकार केली. गायकवाड यांच्या घरापासून अवघ्या दीडशे मीटर अंतरावर असलेल्या बांधावर बिबट्याने कुत्र्याला झाडावर नेऊन लटकवले. सकाळी ही दृश्ये पाहून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी केली आणि बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या. वनरक्षक योगेश पाटील यांनी सांगितले की, या भागात आधीच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. बिबट्याच्या हालचाली टिपण्यासाठी आणि त्याला पकडण्यासाठी वन विभाग सतर्क आहे.
गावाच्या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लहान मुले, महिलांची वर्दळ असल्याने गावकऱ्यांनी वन विभागाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे. वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे, रात्रीच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आणि पाळीव प्राण्यांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जाखले परिसरात बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने शोधमोहीम सुरू केली असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.