कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहत येथे सोमवारी रात्री एका तरुणाला बिबट्या दिसला. त्याने सोशल मीडियावर केलेला मेसेज प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत वन विभागाचे अधिकारी, पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान थर्मल ड्रोनद्वारे बिबट्याचा शोध घेत होते. परंतु, बिबट्याचा थांगपत्ता लागला नाही.
सोमवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास अभिजित सुतार यांना लक्षतीर्थ वसाहत पाणंदीतून रस्ता ओलांडून जाणारा बिबट्या दिसला. सुतार यांनी वेगाने दुचाकी चालवून स्वतःचा बचाव केला. दरम्यान, बिबट्या आल्याच्या चर्चेनंतर सहायक वनसंरक्षक प्रियंका दळवी, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्यासह पथकाने रात्री उशिरापर्यंत थर्मल ड्रोनद्वारे बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.