सुभाष पाटील
विशाळगड : आंबा (ता. शाहूवाडी) परिसरात गेल्या महिनाभरापासून बिबट्याची दहशत कायम असून, आता तर चक्क भरदुपारी दोन बिबट्यांचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी (दि.१० जानेवारी) दुपारी दीडच्या सुमारास अंबेश्वर हायस्कूल आणि प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात ही जोडी वावरताना आढळली. दिवसाढवळ्या झालेल्या या दर्शनाने ग्रामस्थ आणि पर्यटकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.
शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आरोग्य केंद्र आणि हायस्कूलच्या परिसरात दोन बिबटे सावजाच्या शोधात वावरत होते. मात्र, मानवी चाहूल लागताच या बिबट्यांनी आपला मोर्चा आंबा घाटाकडील दाट जंगलाच्या दिशेने वळवला आणि तेथून धूम ठोकली. यापूर्वी या भागात एकाच बिबट्याचा वावर होता, मात्र आता जोडीने बिबटे फिरू लागल्याने परिसरातील धोका अधिक वाढला आहे.
शेतकरी आणि पर्यटकांमध्ये भीतीचे सावट
गेल्या महिनाभरापासून आंबा आणि मानोली परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. यापूर्वी केवळ एक बिबट्या अधूनमधून दिसत होता, मात्र आता चक्क जोडीने वावर सुरू झाल्याने ग्रामस्थांची झोप उडाली आहे. शेतकरी पिकांच्या संरक्षणासाठी रात्रीच्या वेळी जीव मुठीत धरून शेतात जात आहेत. आंबा हे पर्यटन स्थळ असल्याने येथे पर्यटकांची मोठी वर्दळ असते, बिबट्यांच्या दर्शनाने पर्यटनावरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी
बिबट्यांचा वावर आता शाळा आणि दवाखान्यापर्यंत पोहोचल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन, या परिसरात कायमस्वरूपी पिंजरा लावावा आणि बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आंबा परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.
"शाळेच्या परिसरात बिबट्यांचे दर्शन होणे ही गंभीर बाब आहे. मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि पुढील धोका टाळण्यासाठी वनविभागाने तत्काळ पावले उचलणे गरजेचे आहे."अशोक मोरे, मुख्याध्यापक अंबेश्वर हायस्कुल
"आतापर्यंत एकच बिबट्या दिसत होता, पण आता जोडीने वावर सुरू झाल्याने भीती दुणावली आहे. वनविभागाने तातडीने येथे पिंजरा लावून या बिबट्यांचा बंदोबस्त करावा."राजेंद्र लाड, स्थानिक ग्रामस्थ