गुडाळ : राधानगरी तालुक्यातील धामणी प्रकल्प उभारणीचे काम युद्ध पातळीवर सूरू आहे. त्यामुळे बाधित होणाऱ्या राई धरणग्रस्त लोकांना राहण्यासाठी जवळच माळावर नवीन वसाहतीचे बांधकाम चालू आहे. बुधवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास बांधकाम चालू असतानाच या ठिकाणी बिबट्याचे एक पिल्लू धावत त्या ठिकाणी आले. मजुरांना प्रथमदर्शनि लांबून पाहताना ते मांजराचे पिल्लू आहे असे वाटले. परंतु जवळ आल्यानंतर ते बिबट्याचे पिल्लू असल्याचे स्पष्ट झाले.
बांधकांम मजूर दत्तात्रय पालव यांनी वन विभागाला तात्काळ माहिती दिल्यानंतर वनविभागाचे अशोक संकपाळ आपल्या टीम सह तेथे दाखल झाले. त्यांनी बिबट्याचे पिल्लू ताब्यात घेतले असता मादी पासून वेगळे झाल्याने ते अशक्त झाल्याचे निदर्शनास आले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याच्या पिल्ल्यास शेळीचे दूध पाजून आधार देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वनरक्षक अशोक संकपाळ यांनी कोल्हापूर येथील रेस्क्यू टीमला पाचरण केले. बिबट्याच्या मादीचा वेध घेण्यासाठी पिलाला ठेवलेल्या ठिकाणी कॅमेरे लावले आहेत. दरम्यान,खबरदारी म्हणून परिसरातील लोकांनी रात्री अपरात्री घराबाहेर पडू नये असे, आवाहन वन विभाग राधानगरी यांनी केले आहे.
बिबट्याच्या पिलास ड्रोन कॅमेरासह स्थिर कॅमेऱ्यांच्या निगराणी खाली ठेवले आहे. मादी बिबट्याला पकडून पिलासह सुरक्षित ठिकाणी जंगलामध्ये सोडण्याचे वन विभाग विभागाचे नियोजन आहे.