कोल्हापूर

Leopard Attack | कारिवडेत बिबट्याचा दोन शेतकर्‍यांवर हल्ला

जनावरांवरील हल्ला रोखताना दोघेही जखमी

पुढारी वृत्तसेवा

गारगोटी : भुदरगड तालुक्यातील कारिवडे येथे सोमवारी भरदिवसा बिबट्याने दोन शेतकऱ्यांवर हल्ला केला. शेतात जनावरे चारत असताना बिबट्याने प्रथम म्हशीवर झडप घातली. म्हशीला वाचविण्यासाठी गेलेल्या पांडुरंग शंकर देसाई (वय ६०) यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. यात देसाई गंभीर जखमी झाले. त्यांना वाचविण्यासाठी धावलेल्या यशवंत शिवा देसाई यांच्यावरही बिबट्याने हल्ला केल्याने तेही जखमी झाले. या हल्ल्यात म्हैसही जखमी झाली आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी वन विभागास शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पांडुरंग देसाई व यशवंत देसाई हे सोमवारी सकाळी दहा वाजता मळी परिसरातील शेतात जनावरे चारण्यासाठी गेले होते. दुपारी बाराच्या सुमारास झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक म्हशीवर हल्ला केला. म्हशीला वाचविण्यासाठी पांडुरंग देसाई पुढे गेले असता बिबट्याने त्यांच्यावर झडप घेतली.

बिबट्याने देसाई यांच्या कानाला गंभीर दुखापत केली असून, हात व पायावरही हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी होऊन बेशुद्ध पडले. त्यांना वाचविण्यासाठी यशवंत देसाई यांनी धाव घेतली असता बिबट्याने त्यांच्यावरही हल्ला केला. प्रसंगावधान राखत यशवंत देसाई यांनी बिबट्याच्या तावडीतून सुटका करून घेत ग्रामस्थांना माहिती दिली. जखमी पांडुरंग देसाई यांच्यावर गारगोटी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात हलविले.

बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, परिसरात गस्त वाढवावी आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सरपंच अरुण देसाई यांच्यासह ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे. दरम्यान, जिल्हा बँकेचे संचालक प्राचार्य अर्जुन आबिटकर, नगरसेवक अभिषेक खतकर यांनी सीपीआर रुग्णालयात भेट देऊन जखमी पांडुरंग देसाई यांची विचारपूस केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT