बाजारभोगाव : पन्हाळा तालुक्यातील पोहाळवाडी गावाजवळील कुंभारकी शेतशिवारात बिबट्याच्या हल्ल्यात गव्याच्या पिल्लाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. बाजारभोगाव-पोहाळवाडी मुख्य रस्त्यालगत असलेल्या जंगल व शिवार परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पोहाळे तर्फ बोरगाव येथील शेतकरी उत्तम कृष्णात पाटील हे गुरुवारी पोहाळवाडी येथील कुंभारकी शिवारात उसाला पाणी देण्यासाठी गेले असता उसात गव्याचे पिल्लू मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी वन विभागाला माहिती दिली. वन विभागाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता हे पिल्लू मादी जातीचे तीन महिन्यांचे असून, बिबट्याच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पन्हाळा परिक्षेत्र वनाधिकारी अजित माळी यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारभोगावचे वनपाल राजाराम रसाळ, वनरक्षक मच्छिंद्र नवाळी व वनमजुरांनी घटनास्थळी पंचनामा केला. या परिसरात ट्रॅप कॅमेरा लावला असून, शनिवारी रात्री त्यामध्ये बिबट्या स्पष्टपणे आढळून आला आहे.