कर्नाटकातील तीन हत्तींच्या सुटकेसाठी न्यायालयीन लढा pudhari photo
कोल्हापूर

कर्नाटकातील तीन हत्तींच्या सुटकेसाठी न्यायालयीन लढा

बंगळूरू उच्च न्यायालयात 3 सप्टेंबरला होणार सुनावणी

पुढारी वृत्तसेवा

जयसिंगपूर : कर्नाटकातील तीन मठांमध्ये असलेल्या ‘पद्मा’, ‘ध्रुव’ आणि ‘मेनका’ या तीन हत्तींच्या भवितव्याचा फैसला बंगळूरू उच्च न्यायालयात होणार आहे. या हत्तींची सुटका करून त्यांना पुनर्वसन केंद्रात पाठवण्यासाठी दाखल जनहित याचिकेवर 3 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. संबंधित तिन्ही मठांचे विश्वस्त मंडळ न्यायालयात बाजू मांडणार आहेत.

बेळगाव जिल्ह्यातील शेडबाळ येथील श्री शांतिसागर दिगंबर जैन आश्रम, रायबाग तालुक्यातील अलकणूर येथील श्री करीसिद्धेश्वर मठ आणि रायचूर जिल्ह्यातील बिचले येथील गुरू महंतेश्वरस्वामी मंदिर या तीन ठिकाणी असलेल्या हत्तींची स्थिती वाईट असल्याचे वनविभाग अहवालात समोर आले होते.

या आधारे पर्यावरण कार्यकर्ते जी. आर. गोविंद यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. सुरुवातीला हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात होते, मात्र कार्यक्षेत्राचा मुद्दा उपस्थित झाल्याने ते बंगळूरू उच्च न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले. विश्वस्त न्यायालयात हजर झाले असता, न्यायालयाने त्यांची उपस्थिती नोंदवून पुढील सुनावणीसाठी 3 सप्टेंबर ही तारीख दिल्याची माहिती शेडबाळ मठाचे विश्वस्त राजू नांद्रे यांनी दिली.

याचिकेतील गंभीर आरोप

शेडबाळ येथील ‘पद्मा’ (राजणिबाई) या हत्तिणीला दिवसातील 15 तासांपेक्षा जास्त वेळ एकाच जागी साखळदंडाने बांधून ठेवले जाते. यामुळे तिच्या पायांना गंभीर जखमा झाल्या आहेत. परवानगीशिवाय तिला मिरवणुका आणि अन्य कार्यक्रमांसाठी फिरवले जाते, जे नियमांचे उल्लंघन आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

एका हत्तिणीचा मृत्यू, तरीही दुर्लक्ष?

कित्तूर राणी चन्नम्मा मिनी झू येथील पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी वनविभागाला पत्र लिहून ‘पद्मा’, ‘ध्रुव’ आणि ‘उमा’ (बेडकिहाळ) या हत्तींच्या गंभीर स्थितीबद्दल धोक्याचा इशारा दिला होता. दुर्दैवाने, या पत्रानंतर काही महिन्यांतच ‘उमा’ या हत्तिणीचा मृत्यू झाला. मात्र, प्रशासनाने या पत्राची आणि पशुवैद्यकीय अधिकार्‍यांच्या इशार्‍याची कोणतीही दखल घेतली नाही, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. या हत्तींची सुटका न झाल्यास त्यांचे हाल वाढतच जातील, अशी भीतीही याचिकाकर्त्यांनी व्यक्तकेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT