कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दूध संस्थांच्या संचालक मंडळात दुफळी निर्माण झाली आहे. यामधून बनावट कागदपत्रे, सही, शिक्का यांचा वापर करून बोगस ठराव दाखल होण्याची शक्यता आहे. बोगस ठराव दाखल झाल्यास संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा प्राधिकृत अधिकारी तथा सहायक निबंधक कृष्णा ठाकरे यांनी दिला आहे.
दूध संस्था प्रतिनिधी ठरावावरून काही संस्थांमधील राजकीय वातावरण तापले आहे. कोणाच्या नावे ठराव द्यायचा यावरून मतभेद झाले आहेत. त्यामुळे दोन्ही गटांकडून ठराव दाखल होण्याची शक्यता आहे. परिणामी, दुबार ठरावांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम निवडणूक प्रक्रियेवर होणार आहे. त्यामुळे बोगस ठराव असल्याचे निदर्शनास आल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच सहायक निबंधक ठाकरे यांनी ठराव एकत्रिकीकरणात सुसूत्रता आणि गर्दी टाळण्यासाठी काही उपाययोजना करण्याबाबतचे पत्र जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांना दिले होते. या उपाययोजना राबविण्यास पाटील यांनी मंजुरी दिली आहे.
वातावरण तापले,
कार्यालयात पोलिस बंदोबस्त
ठरावावरून राजकीय वातावरण तापले आहे. गुरुवारी शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी येथे ठरावावरून दोन गटांत वाद झाला. मंगळवारपासून (दि.१६) ठराव दाखल करण्यास संस्था प्रतिनिधींची गर्दी होण्याची शक्यता आहे. यामधून सहायक निबंधक कार्यालयातही संस्था प्रतिनिधींमध्ये वादावादीचे प्रसंग उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यालयात सोमवारपासून प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला आहे.
आजअखेर ४५ ठराव दाखल
सहायक निबंधक कार्यालयात शुक्रवारी (दि.१२) दिवसभरात १७ ठराव दाखल झाले. तर आजअखेर आजरा ३, करवीर १४, गडहिंग्लज ८, चंदगड ७, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडीतून प्रत्येकी २, शिरोळ आणि गगनबावडा तालुक्यातून प्रत्येकी १ असे एकूण ४५ ठराव प्राप्त झाले आहेत.
ठराव स्वीकारण्यासाठी १८ टेबल, ४० कर्मचार्यांची नियुक्ती
ठराव स्वीकारण्यासाठीचे सहायक निबंधक कार्यालयाकडून तालुकानिहाय नियोजन केले आहे. १२ तालुक्यांसाठी १८ टेबल ठेवण्यात आले आहे. प्रक्रियेसाठी ४० कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे. करवीर, कागल, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी तालुक्यांसाठी प्रत्येकी दोन तर चंदगड, गडहिंग्लज, आजरा, गगनबावडा, हातकणंगले, शिरोळ या तालुक्यांसाठी प्रत्येकी एक टेबल असणार आहे.
कार्यालयीन वेळेत
स्वीकारणार ठराव
कार्यालयीन वेळेत म्हणजेच सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ठराव स्वीकारले जाणार आहेत. शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीदिवशी ठराव स्वीकारले जाणार नसल्याचे सहायक निबंधक कृष्णा ठाकरे यांनी सांगितले.
ठराव दाखल करण्यासाठी आवश्यक उपाययोजना
ठराव दाखल करण्यासाठी येणारी व्यक्ती संबंधित संस्थेची पदाधिकारी, सचिव, सभासद असली पाहिजे. सोबत ओळखीचा मूळ पुरावा व त्याची छायांकित प्रत आणणे बंधनकारक.
ठराव दाखल करण्यासाठी येणार्या व्यक्तीकडून एकाच संस्थेचा ठराव स्वीकारला जाईल.
मुदतीनंतर पोस्टाने अथवा समक्ष येणारे ठराव स्वीकारले जाणार नाहीत.
प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र कक्ष, तालुक्याच्या कक्षातच ठराव स्वीकारला जाणार.
ठराव दाखल करण्यासाठी येणार्या व्यक्तींची नोद तालुकानिहाय स्वतंत्र कक्षात केली जाणार.