कोल्हापूर

डॉ. अविनाश सुपे यांचे उद्या व्याख्यान

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दै. 'पुढारी' व डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने 'डॉक्टर्स डे'निमित्त 'परिपूर्ण आरोग्यासाठी…' या विषयावर शनिवार, दि. 1 जुलै रोजी ख्यातनाम डॉ. अविनाश सुपे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे सायंकाळी 5 वाजता होणार्‍या या कार्यक्रमात डॉ. सुपे मार्गदर्शन करणार आहेत. गेली 19 वर्षे ही आरोग्य व्याख्यानमाला अविरतपणे सुरू आहे. यंदाचे व्याख्यानमालेचे 20 वे वर्ष आहे. उद्घाटक म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के व आ. ऋतुराज पाटील प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

बदलती जीवनशैली, धावपळीचे व धकाधकीचे जीवन, ताणतणाव, असंतुलित आहार, वाढती व्यसनाधिनता, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, चुकीची आहार पद्धती यामुळे शारीरिक, मानसिक तसेच हृदयविकारासह रक्तदाब, मधुमेह, पोटविकार, मानसिक आजार, कॅन्सर अशा व्याधी वाढत आहेत. यासंदर्भाने डॉ. सुपे आरोग्य जपण्यासाठी ओघवत्या शैलीतून मार्गदर्शन व श्रोत्यांच्या प्रश्नांना थेट उत्तरे देणार आहेत.
प्रवेश अग्रक्रमानुसार देण्यात येणार असून या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. संदीप ज. पाटील यांनी केले आहे.

डॉ. अविनाश सुपे यांचा परिचय

डॉ. अविनाश सुपे यांनी बृहन्मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालय येथे माजी संचालक व अधिष्ठाता म्हणून काम पाहिले आहे. सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज येथे ते सर्जिकल गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागात आजीवन प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. एशिया पॅसिफिक हेपेटो बिलिअरी असोसिशनचे सेक्रेटरी, कोव्हिड काळात मृत्यू दर विश्लेषण कमिटीचे राज्याचे प्रमुख, जीआय सर्जरी बोर्ड, नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनचे चेअरमन आदी जबाबदार्‍या त्यांनी पार पाडल्या आहेत.

डॉ. सुपे यांना डॉ. बी. सी. रॉय पुरस्कारासह 52 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. सर्जरीविषयक जगभरामध्ये मान्यताप्राप्त असणारे लव्ह अण्ड बेली या पुस्तकामध्ये धडा समाविष्ट आहे. 'आरोग्यसंपदा', 'राहा फिट', 'सर्जनशील' ही त्यांनी लिहिलेली पुस्तके गाजली आहेत. उत्कृष्ट छायाचित्रकार, लेखक, संवेदनशील वैद्यकीय शिक्षक, प्रभावी वक्ता, निसर्गप्रेमी, शास्त्रीय संगीताची विशेष आवड असणारा अशी त्यांची ओळख आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT