कोल्हापूर

कोल्हापूर : रंकाळा टॉवरनजीक जलवाहिनीला गळती

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील रंकाळा टॉवर येथे मुख्य जलवाहिनीला गुरुवारी मोठ्या प्रमाणात गळती लागली. पाणीपुरवठा सुरू असल्याने महापालिकेला गळती काढणे शक्य झाले नाही. परिणामी, दिवसभर हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया गेले. गळतीतून पिण्याचे पाणी रस्त्यावरून वाहून थेट गटारात जात असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता.

रंकाळा परिसरात पाणी पुरवठ्यासाठी मुख्य जलवाहिनी आहे. या जलवाहिनीला गळती लागली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने गळती काढण्यासाठी मुख्य रस्त्यावरच खोदाई करण्यात आली आहे. परंतु, गळती सापडली नसल्याने काम अपूर्ण आहे.

आज दुपारी नियमित पाणी पुरवठा सुरू झाला. त्यावेळी गळती लागलेल्या ठिकाणी जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावरून वाहू लागले. याविषयी नागरिकांनी महापालिकेशी संपर्क साधला; मात्र सायंकाळपर्यंत एकही अधिकारी रंकाळा टॉवर येथे फिरकले नाहीत. अखेर पाणीपुरवठा बंद झाल्यानंतरच गळती थांबली.

SCROLL FOR NEXT