कोल्हापूर

Hatkanangle Lok Sabha Constituency : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मातब्बर नेत्यांच्या नावांची शर्यत !

अविनाश सुतार

: आगामी लोकसभा निवडणुकीचे रणांगण अद्याप दूर असले तरी आतापासूनच नगारे वाजू लागले आहेत. यामध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघात (Hatkanangle Lok Sabha Constituency)  राजकीय कुरिक्षेत्रावरील मातब्बर नेत्यांच्या नावांची शर्यत लागली आहे. तसा हा मतदारसंघ राजकीय पटलावर नेहमीच चर्चेत राहिला आहे. येणारी निवडणूकही त्याला अपवाद ठरणार नाही, अशाच काहीशा राजकीय घडामोडींची चर्चा मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात रंगताना दिसत आहे. भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीची उमेदवारीतील संदिग्धता, महाआघाडीबरोबरचा दुरावा स्पष्ट करीत माजी खा. राजू शेट्टी यांनी मांडलेला सवता सुभा, राष्ट्रवादी काँग्रेसने मतदारसंघाची सुरू केलेली चाचपणी, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा मतदारसंघावरचा नैसर्गिक दावा, अशा एकंदर राजकीय 'मिसळ'मधून अनेक नावांची सद्या घुसळण सुरू आहे.

विद्यमान खासदार धैर्यशील माने हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे (Hatkanangle Lok Sabha Constituency)  प्रतिनिधित्व करीत आहेत. यानिमित्ताने माने घराण्यातील सलग तिसऱ्या पिढीला प्रतिनिधीत्वाची दुर्मिळ संधी मिळाली आहे. येणाऱ्या निवडणुकीतही माने हे पुन्हा एकदा महायुतीतून दंड थोपटण्याच्या तयारीत आहेत. उद्धव ठाकरे यांनी मानेंना शिवसेना पक्षात ऐनवेळी प्रवेश देऊन थेट संसदेत पोहचविण्याची मोठी किमया केली. मात्र मानेंनी ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटाबरोबर युतीची वाट धरली आहे. अर्थात त्यांना आता युतीतच उमेदवारीवरून मोठा संघर्ष करावा लागण्याची चिन्हे आहेत. माने यांना भाजपच्या चिन्हावर लढण्याचा पर्याय खुणावत असला तरी ऐनवेळी इलेक्ट्रिव्ह मेरिटच्या मुद्द्यावर उमेदवार बदलण्याच्या या पक्षाच्या सुप्त हालचाली सुरू आहेत. यातून भाजपतर्फे माजी आ. सुरेश हाळवणकर, अपक्ष आ. प्रकाश आवडे यांचीही नावे चर्चेत आहेत. यामुळे येथे खुंटा बळकट करण्याच्या प्रयत्नातील धैर्यशील माने यांना युतीतूनच काटशह सहन करावा लागत असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान महाआघाडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाने या जागेवरचा आपला नैसर्गिक हक्क कायम राहणार असल्याचे सांगितले आहे. मागच्या निवडणुकीत राजू शेट्टी यांच्या पराभवाला मोठा हातभार लावणारे वंचित आघाडीचे अस्लम सय्यद यांनी ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे शिवसेनेकडून सय्यद पुन्हा मैदानात येऊ शकतात. तर ग्रामीण जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या उमेदवारीचे सूतोवाचही केले जात आहे. तर मानेंच्या दलबदलीमुळे ठाकरे गटाची ताकद कमी झाल्याचे अप्रत्यक्षपणे सुचवत राष्ट्रवादी काँग्रेसने मतदारसंघात हस्तक्षेप करायला सुरुवात केली आहे. तसे पाहता पक्षाच्या स्थापनेपासून या जागेवर राष्ट्रवादी लढलेली आहे. आणि निवेदिता माने यांनी पक्षाच्या 'घड्याळ' चिन्हावर सलग दोनवेळा निवडणूक जिंकली होती. आताही पक्षाच्या मुंबईतील बैठकीत येथील उमेदवारीवरून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, त्यांचे पुत्र प्रतीक पाटील, कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड यांच्या नावावर मोठी खलबते झाल्याच्या बातम्या जेष्ठ नेत्यांच्या हवाल्याने माध्यमात झळकल्या आहेत. यावरून महाविकास आघाडीने आगामी लोकसभेसाठी राजू शेट्टी यांना आम्ही गोंजारणार नाही किंबहुना बायपासही देणार नाही, हा संदेश मतदारसंघात पोहचविण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

दरम्यान स्वाभिमानीचे अध्यक्ष माजी खा. राजू शेट्टी यांच्या मनात महायुतीने मोठी फसवणूक केल्याचा राग धुमसत असल्याचे ओळखून महाआघाडीच्या नेत्यांनी फासे टाकायला सुरुवात केली आहे. शेट्टींनी देखील 'एकला चलो रे'चा जप करीत मतदारसंघात वातावरण निर्मितीवर भर दिला आहे. गेल्या वर्षभरापासून शाहूवाडी तालुक्यात बैठकांचा सिलसिला कायम ठेवला आहे. शिवाय मध्यंतरी वनविभाग, वीज खाते तसेच महसूल यंत्रणेविरोधात स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन मोठा मोर्चाही काढला होता. काहीही झाले तरी मागील पराभवाचा वचपा काढायचाच या इराद्याने पायाला भिंगरी बांधलेल्या राजू शेट्टींनी हातकणंगलेच्या मैदानातील 'सरावात' सद्या तरी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. एकंदरीत मातब्बर नेत्यांमध्ये शर्यत लागल्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे.

Hatkanangle Lok Sabha Constituency : भाजप-सेना युतीच्या पराभवाचे ध्येय..!

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पडद्यामागे अनेक सुप्त घडामोडी घडत आहेत. यामध्ये हातकणंगलेत राजू शेट्टी हे हुकमी एक्का म्हणून आपल्याकडे कसे वळतील यासाठी महायुती आणि महाआघाडीमध्ये छुपी रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येते. संबंधित जबाबदार नेत्यांची 'सावध' वक्तव्ये याचीच पुष्टी करतात. मात्र, स्वतंत्र लढण्यातच राजकीय हित असल्याचे ओळखून शेट्टींनी निवडणुकीत उतरण्याचे ठरविल्यामुळे महाविकास आघाडीने तगडा उमेदवार रिंगणात उतरविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यावरून शर्यतीत कोण जिंकतो यापेक्षा भाजपच्या पराभवाचे ध्येय आघाडीच्या नेत्यांनी डोळ्यासमोर ठेवल्याचे जाणकारांच्या नजरेतून सुटत नाही.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT