कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत ऐनवेळी मैदानात उतरलेल्या जनसुराज्य पक्षाने महाविकास आघाडी तसेच महायुतीच्या उमेदवारांना मोठा धक्का दिला आहे. विविध प्रभागांमध्ये जनसुराज्यच्या उमेदवारांनी किमान 300 ते कमाल 4 हजारांपर्यंत मते खेचून घेतल्याने दोन्ही आघाड्यांच्या गणितात मोठा बदल झाला. काही प्रभागांमध्ये या मत विभाजनामुळे महाविकास आघाडीच्या तर काही ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला आहे.
विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 10 मध्ये जनसुराज्यचे उमेदवार अक्षय जरग यांनी 6 हजारांहून अधिक मते मिळवत विजय संपादन केला आहे. त्यामुळे जनसुराज्यची ताकद पुन्हा एकदा शहराच्या राजकारणात ठळकपणे समोर आली आहे. महापालिकेची निवडणूक प्रामुख्याने महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढविली गेली. मात्र ऐनवेळी जनसुराज्यने निवडणूक रिंगणात उडी घेतली. दोन्ही आघाड्यांकडून उमेदवारी नाकारण्यात आलेले तसेच पक्षासाठी काम करण्यास इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांना एकत्र करत जनसुराज्यने महापालिकेच्या 29 प्रभागांत उमेदवार उभे केले. प्रचारातही या उमेदवारांनी आघाडी घेत दोन्ही आघाड्यांसमोर तगडे आव्हान निर्माण केले.
यापूर्वी 2005 मध्ये जनसुराज्यने महापालिकेची निवडणूक मोठ्या ताकदीने लढवली होती. त्यावेळी पक्षाचे 9 उमेदवार निवडून आले होते आणि तत्कालीन ताराराणी आघाडीसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. पुढे 2008 मध्ये पक्षाचे उदय साळोखे यांनी महापौरपदही भूषविले होते. मात्र त्यानंतरच्या काळात पक्षांतर्गत हालचाली आणि उड्या यामुळे जनसुराज्य काहीसा महापालिकेच्या राजकारणापासून दूर गेला.
सुमारे पंधरा वर्षांनंतर जनसुराज्यने पुन्हा एकदा महापालिकेच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांनी प्रभाग क्रमांक 10 मधील प्रचारफेरीत सहभाग घेतला होता. याच प्रभागातून अक्षय जरग विजयी झाले. प्रदेशाध्यक्ष सुमित कदम यांनी संघटन बांधणी करून उमेदवार उभे करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. परिणामी या निवडणुकीत जनसुराज्यने दोन्ही आघाड्यांच्या उमेदवारांची चांगलीच कोंडी केली आहे.