कोल्हापूर : रत्नागिरी - नागपूर महामार्गासाठी पन्हाळा ते हातखंबा या गावांच्या दरम्यान होत असलेल्या डोंगरांच्या खोदाईमुळे भविष्यात या भागातील गावे आणि वाड्या-वस्त्यांना कायमस्वरूपी भूस्खलनाच्या छायेत राहावे लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भूस्खलनाचा हा धोका दूर करण्यासाठी कापण्यात आलेले डोंगर सिमेंट काँक्रिटने कायमस्वरूपी बंदिस्त करण्याची आवश्यकता वर्तविण्यात येत आहे.
सध्या रत्नागिरी-नागपूर या चौपदरी महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. या महामार्गाचा कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडापासून ते रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा या गावापर्यंतचा जवळपास 100 किलोमीटरचा भाग सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधील डोंगर-दर्यातून जातो. महामार्गासाठी या भागातील अनेक डोंगर सध्या उभे कापण्यात येत आहेत, तसेच काही सखल भाग आणि दर्या भराव टाकून मुजविण्यात येत आहेत. पन्हाळा, बांबवडे, मलकापूर, आंबा, हातखंबा, दाभोळे, पाली, नाणिज या भागात डोंगरांची ही कापाकापी आणि भराव टाकण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पाच-दहा फुटांपासून ते शंभर फुटापर्यंत उंचीचे डोंगरांचे कडे उभे तासण्यात येत आहेत. तसेच काही ठिकाणी तेवढाच भराव टाकण्याचे काम सुरू आहे.
डोंगरांचे कडे तोडत असताना तसेच दर्यांमध्ये भराव टाकत असताना या पर्वत रांगेमधील हजारो वृक्षांची कत्तल होताना आणि तेवढेच वृक्ष मातीखाली गाडले जाताना दिसत आहेत. वर्षानुवर्षे याच वृक्षांच्या मुळ्यांमुळे सह्याद्रीतील पर्वतरांगांना घट्ट जखडून ठेवण्याचे काम केलेले आहे. त्यामुळे कितीही मोठा पाऊस झाला तरी या भागात आजपर्यंत तरी भूस्खलनाच्या फार मोठ्या घटना घडलेल्या नाहीत. मात्र आता हजारो वृक्ष तोडले गेल्यामुळे डोंगरमाथे उजाड-बोडके आणि ठिसूळ होताना दिसत आहेत. त्यामुळे भविष्यात मोठ्या पावसात किंवा भूकंपांसारख्या घटनांच्या वेळी हे डोंगर कितपत तग धरून राहतील त्याबाबत साशंकताच व्यक्त केली जात आहे.
साधारणत: 1980 च्या दशकापासून सह्याद्रीच्या पश्चिम घाटातील कोकण पट्ट्याला भूस्खलनाचा धोका निर्माण झाल्याचे दिसते. मुंबई-गोवा महामार्गासह अन्य महामार्गासाठी झालेली खोदाई, वेगवेगळ्या खनिजांसाठी होत असलेली सह्याद्री पठाराची पोखरण, बेसुमार वृक्षतोड आदी उपद्रव सुरू झाल्यापासूनच कोकणपट्ट्यात भूस्खलनाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे आढळून येते. रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी सध्या होत असलेल्या डोंगरांच्या कापाकापी आणि पोखरणीमुळे आता नव्याने आंबा ते हातखंबा या भागाला भूस्खलनाचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या भागात पावसाचे प्रमाण वार्षिक 5000 मिलिमीटरपेक्षाही जादा आहे. त्यामुळे भूस्खलनाच्या धोकाही तेवढाच मोठा असणार आहे. त्यामुळे याबाबतीत आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राज्य शासनाने योग्य त्या उपाययोजना करून संभाव्य भूस्खलनाचा धोका टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
1983 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात दरडी कोसळण्याच्या लहान-मोठ्या 50 हून अधिक घटना घडून त्यामध्ये 23 लोक ठार झाले होते. 1989 मध्ये पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील वेगवेगळ्या 12 ठिकाणी दरडी कोसळून त्यामध्ये भाजे येथील 38 व्यक्ती गाडल्या गेल्या होत्या. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात 2005 मध्ये दरड कोसळण्याच्या पंधराहून अधिक घटना घडून जवळपास 200 लोकांचा बळी गेला होता. 2014 मध्ये माळीण येथील भूस्खलनाच्या घटनेत 150 लोक गाडले गेले. त्याचवर्षी आंबेगाव येथेही भूस्खलनाची मोठी घटना घडली होती. 22 जुलैै 2021 रोजी रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील तळीये हे अख्खे गावच्या गाव भूस्खलनात गाडले जाऊन 87 लोकांचा बळी गेला होता. दोन वर्षांपूर्वी 19 जुलै 2023 रोजी रात्री भूस्खलनाच्या घटनेत रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी हे गाव गाडले जाऊन शंभरावर लोकांचा बळी गेला होता.