कोल्हापूर : पन्हाळा, जोतिबा, शिपेकरवाडी, सातेरी डोंगर, आपटी, मराठवाडी, नागदेववाडी, कुपलेवाडी या कोल्हापूर जिल्ह्यातील आठ गावांत असणारा भूस्खलनाचा धोका कमी करण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. याकरिता डीपीआर तयार केला जाणार आहे. तांत्रिक सल्लागार संस्था नेमण्यासाठी गुरुवारी राज्य शासनाने 12 कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि भीमा नदी खोर्यातील भविष्यातील आपत्ती निवारण, क्षमता बांधणी, पूर नियंत्रण व्यवस्थापन, दुष्काळ व पूर व्यवस्थापन इत्यादी नियोजनासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम (एमआरडीपी) राबविण्यात येत आहे. या अंतर्गत भूस्खलन झालेल्या तसेच त्याचा धोका असणार्या ठिकाणी विविध उपाय योजना राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये सर्वेक्षण, तांत्रिक व प्रयोगशाळा तपासण्या, मूल्यांकन, सौम्यीकरणाच्या विविध उपाय योजनांचा समावेश असेल. पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, करवीर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भूस्खलन होते.
डीपीआर तयार करण्यासाठी तांत्रिक सल्लागार संस्था नियुक्तीसाठी 12 कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे डीपीआरसाठी लवकरच निविदा प्रसिद्ध केल्या जातील, येत्या काही महिन्यात याबाबतचा अहवाल राज्य शासनाला सादर होईल. पुढील वर्षापासून उपाययोजना सुरू होतील.