इचलकरंजी : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी (आरटीओ) अखेर स्वतंत्र व हक्काची जागा मिळणार असून अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त अशा कार्यालयाच्या उभारणीसाठी तब्बल 61 कोटी निधी मंजूर केला आहे. आमदार राहुल आवाडे यांच्या मागणीवरून मुंबईत झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हे आदेश दिले. या निर्णयामुळे शहापूर येथे भव्य प्रशासकीय इमारत, ऑटोमॅटिक टेस्टिंग सेंटर आणि ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सध्या शहापूर येथील शासकीय विश्रामगृहाच्या जागेत हे कार्यालय सुरू आहे. मात्र, पूर्णवेळ कामकाज सुरू झाल्याने ही जागा अपुरी पडत होती. त्यातच शासनाने वाहन योग्यता प्रमाणपत्र व अनुज्ञप्ती चाचणी स्वयंचलित यंत्रणेद्वारे करणे अनिवार्य केल्याने जागेची अडचण होती. या पार्श्वभूमीवर आमदार आवाडे यांनी मंत्री सरनाईक यांच्याकडे पाठपुरावा केला होता. गुरुवारी झालेल्या बैठकीत त्यांनी शहापुरातील गट क्रमांक 468 हा शासकीय भूखंड कार्यालयासाठी देण्याची मागणी केली. चर्चेअंती मंत्री सरनाईक यांनी हा भूखंड उपलब्ध करून देण्यासह तिथे आवश्यक सुविधा उभारण्यासाठी 61 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याचे निर्देश दिले.