कोल्हापूर : रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गांतर्गत अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कोल्हापूर - सांगली टप्प्यातील कामाला आता वेग आला आहे. गेल्या १२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या ३३ किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र भूसंपादन प्रक्रियेमुळे रुंदीकरणास खोडा बसला आहे.
निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी वर्कऑर्डर देण्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे जोपर्यंत भूसंपादनाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत वर्कऑर्डर देता येत नाही. त्यामुळे निधी असूनही काम रखडल्याचे चित्र आहे. चोकाक ते उदगाव-अंकली या ३३ किमी मार्गासाठी एकूण १ हजार ८५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये ८५० कोटी रुपये महामार्ग रुंदीकरणासाठी, तर ३०० कोटी रुपये भूसंपादनासाठी खर्च केले जातील. सार्वजनिक बांधकाम आणि कृषी विभागाकडून मूल्यांकनाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे भूसंपादन प्रक्रिया लांबल्याने कामास विलंब होत आहे.
या नवीन महामार्गामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील दळणवळण सुलभ होणार आहे. प्रकल्पांतर्गत हातकणंगले येथे ९०० मीटरचा उड्डाणपूल आणि उदगाव येथे कृष्णा नदीवर २४० मीटर लांबीचा नवीन पूल उभारला जाणार आहे. तसेच तमदलगे आणि निमशिरगाव येथे बायपास काढण्यात येणार असल्याने शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
दृष्टिक्षेपात महामार्ग
एकूण अंतर : ३३ कि.मी.
भुयारी मार्ग : ११
हातकणंगले पूल : ९०० मीटर
कृष्णा नदी पूल : २४० मीटर
बायपास : तमदलगे आणि निमशिरगाव