Ambabai Temple Development Plan | अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत परिसरातील भूसंपादन समन्वयामधूनच 
कोल्हापूर

Ambabai Temple Development Plan | अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत परिसरातील भूसंपादन समन्वयामधूनच

जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांची ग्वाही; व्यापारी-व्यावसायिकांनी मांडले प्रश्न

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत मंदिर परिसरातील भूसंपादनाबाबत व्यापारी व व्यावसायिकांशी योग्य संवाद साधून, समन्वयातूनच पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिली. बुधवारी मंदिर परिसरातील व्यापारी व व्यावसायिकांची बैठक झाली. यावेळी अंबाबाई मंदिर परिसर व्यापारी व रहिवासी संघाने विकास आराखड्याबाबत विविध प्रश्न उपस्थित करून स्थानिक नागरिक व व्यावसायिकांना विश्वासात घेऊन पारदर्शकपणे प्रक्रिया राबविण्याची मागणी केली. यावेळी डॉ. राठोड यांनी संवाद साधला.

मंदिर परिसर विकास आराखड्याचा नेमका उद्देश काय, कोणत्या विद्यमान समस्या सोडविण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आणि त्यासाठी हाच पर्याय का निवडण्यात आला, याबाबत स्पष्टता देण्याची मागणी व्यापारी व व्यावसायिकांनी केली. भूसंपादन प्रक्रियेनंतर आमच्या पुनर्वसनाचे काय, हा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला.

अंबाबाई मंदिर आणि परिसरातील बाजारपेठ ही गेल्या सुमारे १२० वर्षांत विकसित झालेली आर्थिक-सामाजिक व्यवस्था आहे. त्यामुळे मंदिराचा विकास करताना बाजारपेठ, स्थानिक व्यवसाय, भाविक, नागरिक आणि शहराच्या अर्थव्यवस्थेचा एकत्रित विचार करावा, असे संघटनेच्यावतीने नमूद करून भूसंपादनामुळे विद्यमान व्यवसाय व रोजगारावर होणाऱ्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणामांचा स्वतंत्र अभ्यास करण्याची मागणीही करण्यात आली.

भाविकांची संख्या वाढल्यानंतर गर्दी, वाहतूक, पार्किंग, पाणी, स्वच्छतागृहे, वैद्यकीय सुविधा आणि आपत्ती व्यवस्थापनाची क्षमता पुरेशी राहील का, असा सवाल उपस्थित करण्यात आला. तसेच वाहतूक परिणाम अभ्यास, आपत्कालीन मार्ग आणि गर्दी व्यवस्थापनाचे स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे का, याची माहिती देण्याची मागणी करण्यात आली.

व्यापाऱ्यांच्या प्रमुख मागण्या

आराखड्याचा मूळ उद्देश व गरज स्पष्ट करावी.

भूसंपादनामुळे बाधित होणाऱ्यांशी पारदर्शक संवाद साधावा.

मंदिर आणि बाजारपेठेचा एकत्रित विकास विचारात घ्यावा.

पर्यायी व कमी हस्तक्षेपाच्या उपायांचा अभ्यास करावा.

वाहतूक, पार्किंग व आपत्ती व्यवस्थापनाचा स्वतंत्र अभ्यास करावा. विद्यमान व्यवसाय व रोजगारावर होणाऱ्या परिणामाचे मूल्यांकन करावे. पुढील प्रक्रियेसाठी स्थानिक नागरिकांची स्वतंत्र बैठक घ्यावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT