वाशी :
तुझ्या दर्शनाची आस, कधी थांबायाची नाही!
उभ्या जन्मात विठ्ठला, वारी चुकायची नाही!...
अभंगातील या ओळींमधील अढळ श्रद्धा उराशी बाळगून आषाढी वारीसाठी लाखो वारकरी आज प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्या नंदवाळ (ता. करवीर) येथे दाखल झाले आहेत. टाळ-मृदंगाचा गजर आणि विठूच्या नामाच्या जयघोषाने अवघा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला असून, आषाढी वारीचा उत्साह अक्षरशः शिगेला पोहोचला आहे. यात्रेच्या सुव्यवस्थापनेसाठी प्रशासनाने सर्व पातळीवर आपले काटेकोर नियोजन केले असून भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे.
शनिवारी सकाळपासूनच जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून सुमारे सातशेहून अधिक दिंड्या ‘विठ्ठल-रखुमाई’च्या जयघोषात नंदवाळच्या दिशेने मार्गस्थ होत होत्या. दिवसभर मंदिर आणि यात्रा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघालेले विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, स्वागतासाठी सज्ज कमानी आणि भाविकांच्या सेवेसाठी उभारलेले मंडप यामुळे सर्वत्र चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षित यात्रेसाठी सर्व सोयींनीयुक्त 4 रुग्णवाहिका, 24 तास अधिकारी व कर्मचार्यांचे आरोग्य पथक तैनात आहे. तसेच करवीर आणि इस्पुर्ली पोलिस ठाण्यांच्या वतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून अखंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरणचे पथकही तैनात केले आहे.
यात्रा परिसरावर करडी नजर ठेवण्यासाठी मंदिर परिसरात 12 आणि मुख्य रस्ता, दर्शन रांग व इतर महत्त्वाच्या ठिकाणी 14 असे एकूण 26 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
एकीकडे विठुरायाच्या भेटीची ओढ आणि दुसरीकडे प्रशासनाची तत्परता या दोन्हींच्या सुरेख संगमातून नंदवाळची ही आषाढी वारी केवळ एक यात्रा न राहता भक्ती आणि श्रद्धेचा एक अविस्मरणीय सोहळा ठरत आहे.
कोल्हापूर : ‘टाळ वाजे मृदंग वाजे, वाजे हरीच्या वीणा, माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल बाोला...’ अशा भक्तिभावाने सर्वत्र आषाढी वारी साजरी करण्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यंदा सार्वजनिक सुट्टीच्या रविवारी (दि. 6) आषाढी एकादशी असल्याने लोकांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. विठ्ठल दर्शनासह ठिकठिकाणच्या दिंडी सोहळ्यांत सहभागी होण्याची तयारी आबालवृद्धांनी केली आहे.
आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशीला वारकरी सांप्रदायात मोठे महत्त्व आहे. या दिवशी विठ्ठल दर्शनाला विशेष महत्त्व असल्याने शहर, उपनगरासह ग्रामीण भागातील विठ्ठल मंदिरांत विशेष तयारी करण्यात आली आहे. याचबरोबर विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आषाढीच्या उपवासालाही महत्त्व असल्याने घरोघरी महिलांकडून विविध उपवासांच्या पदार्थांची तयारी करण्यात आली आहे.
शाळांमध्ये बालचमूंचे रंगले दिंडी सोहळे
शनिवारी शाळांमध्ये बालचमूंंचे दिंडी सोहळे रंगले होते. विठ्ठल-रुक्मिणी, वारकरी यांची वेशभूषा करून टाळ, मृदंग, वीणा, तुळशीचे रोप, भगवी पताका घेऊन विठ्ठल नामाचा जयघोष केला.