कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त अंबाबाई मंदिरात बुधवारी झालेली गर्दी.  (छाया : मिलन मकानदार)
कोल्हापूर

Ambabai Temple | लाखांवर भाविकांनी नयनी साठवले आई अंबाबाईचे रूप

नवरात्रौत्सवातील चौथ्या माळेला गर्दीने फुलले मंदिर

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवामध्ये करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी बुधवारी चौथ्या माळेला देशभरातील विविध राज्यांतील भाविकांनी गर्दी केली. भाविकांच्या गर्दीने मंदिर प्रांगणासह आसपासचा परिसर फुलून गेला होता. या भाविकांकडून ‘आई अंबाबाईचा उदो उदो’, ‘उदं गं अंबे उदं’च्या जयघोष सुरू होता. पहाटे काकड आरतीनंतर अभिषेक विधी झाल्यानंतर दर्शन खुले करण्यात आले.

रविवारपासून घटस्थापनेनंतर श्री अंबाबाई मंदिरामध्ये शारदीय नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला. पहिल्या माळेपासून मोठ्या संख्येने भाविक श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत. पहाटेपासूनच मंदिराच्या परिसरात रांगा लागल्या. देवीच्या दर्शनानंतर प्रसाद घेण्यासाठीही भाविकांनी गर्दी केली होती.

ऑनलाईन दर्शनाचाही लाभ

लाईव्ह प्रक्षेपणाव्दारे ही जगभरातील अनेक भाविक श्री अंबाबाईचे दर्शन घेत आहेत. त्याचबरोबर शहरातील प्रमुख चौकात लावण्यात आलेल्या स्क्रीनच्या माध्यमातून भाविक श्री अंबाबाईचे दर्शन घेत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यातून देवीचे फोटो तसेच व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. त्याचबरोबर प्रसादाचे लाडू, निर्माल्यापासून तयार करण्यात आलेली अगरबत्ती, देवीचे फोटो, कुंकू आदी वस्तू भाविक आपल्या घरी घेऊन जात आहेत.

ललितसहस्रनामासह भावगीतांची पर्वणी

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये नवरात्रौत्सव काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जात आहेत. यामध्ये बुधवारी ‘ललितसहस्रनाम’ने सुरुवात झाली, तर त्यानंतर जगदीश गुळवणी यांनी ‘श्रीसुक्त’ पठण केले. त्यानंतर श्री करवीर निवासिनी महिला भजनी मंडळ, दुर्गा माता भजनी मंडळ, श्री लक्ष्मी नृसिंह भजनी मंडळ इचलकरंजी, गजानन महाराज भजनी मंडळ आणि श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ कावळा नाका, कोल्हापूर यांचे भजनाचे कार्यक्रम झाले.

दर्शनरांगेत स्टीलचे बेंच

नवरात्रौत्सवात दर्शनासाठी किमान चार ते पाच तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने वयोवृद्ध भाविक तसेच लहान मुलांसोबत असलेल्या महिला भाविकांची गैरसोय होत होती. बुधवारपासून मुख्य दर्शनरांगेत देवस्थान समितीच्या वतीने काही ठिकाणी स्टीलचे बेंच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याबद्दल भाविकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT