कोल्हापूर

महिला कॉन्स्टेबलला लाच घेताना रंगेहाथ पकडले

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पती-पत्नीच्या वादामध्ये समुपदेशन केल्यानंतर समजपत्र काढण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना महिला सहाय्यता कक्षातील महिला कॉन्स्टेबल काजल गणेश लोंढे (वय. 28, रा. पसरिचानगर, सरनोबतवाडी) हिला लाचलुचपत व प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई झाली. पोलिस मुख्यालयाच्या इमारतीत असणार्‍या या कार्यालयातच ही कारवाई झाल्याने पोलिस दलात खळबळ माजली.

याबाबत मिळालेली माहिती अशी ः पती-पत्नीच्या वादातून महिला सहाय्यता कक्षाकडे दि. 19 जूनला आलेल्या एका तक्रारीबाबत संबंधित पती आणि पत्नीला या कक्षातर्फे समुपदेशन करण्यात आले होते. त्यानंतर संबधित दांम्पत्यातील वाद संपुष्टात आला. सध्या हे दांम्पत्य सुखाने नांदत आहे. हा अर्ज निकाली काढल्यानंतरचे समजपत्र काढण्यासाठी महिला सहाय्यता कक्षात कार्यरत असणार्‍या काजल लोंढे या महिला कॉन्स्टेबलने दोन हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदार महिलेच्या पतीने याबाबतची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानुसार गुरुवारी सापळा रचण्यात आला. सायंकाळी सहा वाजता ठरल्याप्रमाणे दोन हजार रुपयाची लाच घेताना लोंढे यांना पकडले.

संबधित महिला 2014 मध्ये पोलिस दलाच्या सेवेत रुजू झाली आहे. नोव्हेबर 2022 पासून महिला सहाय्यता कक्षाकडे कार्यरत आहे. ही कारवाई पोलिस उपअधिक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, प्रकाश भंडारे, पोलिस कॉन्स्टेबल अजय चव्हाण, विकास माने, सचिन पाटील, संगीता गावडे, पूनम पाटील आदींच्या पथकांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT