कोल्हापूर : महायुती सरकारकडून मकर संक्रांत सणाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचे ॲडव्हान्स, असे दोन महिन्याचे तीन हजार रुपये अनुदान एकत्र दिले जाणार होते. विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे निवडणूक काळात या दोन्हीही महिन्यांचे पैसे देऊ नयेत, अशी आचारसंहिता भंगाची तक्रार केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने फक्त डिसेंबरचेच अनुदान द्या व जानेवारीचे नंतर द्या, असा आदेश दिला.
त्यामुळे संक्रांतीच्या सणाला दोन महिन्यांचे एकत्रित मिळणारे पैसे लाडक्या बहिणींना मिळाले नाहीत. या पद्धतीने लाडक्या बहिणींच्या तोंडचा घास काढून घेतला. ऐन सणासुदीच्या तोंडावर तोंडचा घास काढून घेणाऱ्या दुष्ट विरोधकांना लाडक्या बहिणी या निवडणुकीत हिसका दाखवून अद्दल घडवतील, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.
प्रभाग क्रमांक 18 मध्ये शास्त्रीनगर येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर प्रचार सभेत मंत्री मुश्रीफ बोलत होते. व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते संताजीबाबा घोरपडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, तोंडावर आलेली भोगी, संक्रात आणि किंक्रांत अशा तिहेरी सणाचा योग साधत सरकारने सबंध महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना ही संक्रांतीची भेट देण्याचे नियोजन केले होते. ऐन सणासुदीच्या तोंडावरच लाडक्या बहिणींच्या तोंडचा घास हिरावणाऱ्या काँग््रेास पक्षाला लाडक्या बहिणी हिसका दाखविणारच.
भोग सरंल, सुख येईल
मंत्री मुश्रीफ म्हणाले, या सणासुदीच्या दोन हप्त्यांच्या रूपाने आमच्या माता-भगिनींचा ‘भोग सरल..... सुख येईल......!’ अशी आमची भावना होती; परंतु विरोधकांच्या नाकर्त्या आणि आडमुठ्या भूमिकेमुळे आमच्या लाडक्या बहिणींचे दुःख, भोग तसेच राहिले आहेत. त्या निश्चितच विरोधकांना मताच्या रूपाने हिसका दाखवतील. भविष्यात लाडक्या बहिणीला दरमहा 2100 रुपये देऊन ही गोष्ट आम्ही भरून काढल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे महायुतीला सत्ता द्या, ‘भोग सरंल, सुख येईल...’ या गाण्याच्या ओळीही मुश्रीफ यांनी म्हटल्या.