कोल्हापूर

Kolhapur Crime : कुरुंदवाडमध्ये बेकायदेशीर मावा विक्रेत्यांना पोलिसांचा दणका; चार ठिकाणी धडक कारवाई!

'पुढारी'च्या बातमीची दखल; माव्याच्या पुड्यांसह मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

नृसिंहवाडी : कुरुंदवाड शहर व परिसरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात कुरुंदवाड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. याबाबत दैनिक पुढारीने सविस्तर वृत्तासह आवाज उठवला होता. याची दखल घेत पोलिसांनी चार स्वतंत्र ठिकाणी कारवाई करत १२२ माव्याच्या पुड्या आणि २ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी संबंधित चार जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, संबंधितांकडून सुगंधी तंबाखू, सुपारी व विविध पदार्थांचे मिश्रण करून मावा तयार करण्यात येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. हा मावा प्लास्टिकच्या कागदामध्ये पुडी करून त्यावर कोणतेही लेबल अथवा वैधानिक आरोग्य इशारा न लावता विक्री केला जात असल्याचेही कारवाईत आढळून आले.

पोलिसांनी कुरुंदवाड आणि परिसरातील पान टपऱ्यांवर धडक कारवाई करत अवैध मावा विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत कुरुंदवाड येथील 'राधे पान भवन'वर छापा टाकून दत्तात्रय पुंडलिक सूर्यवंशी (वय ३३, रा. शिरोळ) याच्याकडून ७२० रुपयांच्या ३६ माव्याच्या पुड्या, तर 'गणेश पान शॉप'मधून ओंकार अशोक कोळी (वय २६, रा. शिरोळ) याच्याकडून ६४० रुपयांच्या ३२ पुड्या जप्त करण्यात आल्या. कारवाईचे हे सत्र पुढे सुरू ठेवत पोलिसांनी अब्दुललाट येथील 'प्लेयरस पान शॉप'वर कारवाई केली आणि म्हैफुज तेरदाळे याच्याकडून ४४० रुपयांच्या २२ पुड्या हस्तगत करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. याशिवाय, कुरुंदवाडमधील महाराणा प्रताप चौकातील 'स्टार पान शॉप' परिसरात केलेल्या आणखी एका कारवाईत समीन बालेचाँद पैलवान (वय ४३) याच्याकडून ६४० रुपये किमतीच्या ३२ माव्याच्या पुड्या जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे कुरुंदवाड शहर व परिसरातील अवैध तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

माव्यावर प्रथमच कारवाई

कुरुंदवाड शहरात मावा विक्री गेल्या अनेक वर्षांपासून राजरोसपणे सुरू होती. मात्र, कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांनी रस्त्यावर उतरून कारवाईची मोहीम स्वतः हाती घेतली. अशी कारवाई पोलिसांनी प्रथमच केल्याने शहरवासीयांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT