कोल्हापूर

कुरुंदवाडात महाकाय होर्डिंगचा धोका; ११ केव्ही तारांवर पोस्टर कोसळून शॉर्टसर्किट, शहर अंधारात

होर्डिंग आणि उच्चदाब तारांमधील कमी अंतरामुळे हा परिसर “मृत्यूचा सापळा” बनला आहे

पुढारी वृत्तसेवा

कुरुंदवाड : येथे गुरुवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे सैनिकी पॅटर्न शाळेच्या मैदानातील मोठे जाहिरात होर्डिंग फाटून 11 हजार व्होल्टेजच्या उच्चदाब विजतारांवर कोसळले. यामुळे भीषण शॉर्टसर्किट होऊन संपूर्ण शहराचा वीजपुरवठा खंडित झाला. घटना रात्री घडल्याने मोठी जीवितहानी टळली असून, अन्यथा मुंबईतील घाटकोपर दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता होती.

वीज वितरण कंपनीने दोन वर्षांपूर्वीच हे धोकादायक होर्डिंग हटवण्याबाबत शाळा व्यवस्थापनाला पत्र दिले होते. पालिकेनेही संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली होती. मात्र अद्यापही कोणतीही कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नृसिंहवाडी ते तेरवाड मार्गावर डिजिटल फलक मोठ्या प्रमाणात उभारले आहेत, या फलकांना बांधकाम विभागाने कोणतीही परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे. परवानगी नसतानाही हे फलक कोणाच्या आशीर्वादाने उभे आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे.घटनास्थळी दररोज विद्यार्थी, खेळाडू व या महामार्गावर वाहनांची व नागरिकांची मोठी वर्दळ असते. होर्डिंग आणि उच्चदाब तारांमधील कमी अंतरामुळे हा परिसर “मृत्यूचा सापळा” बनला आहे. घटनेनंतर वीज यंत्रणा ठप्प झाली होती. वीज कर्मचाऱ्यांनी पहाटे उशिरा पर्यंत प्रयत्न करून पुरवठा पूर्ववत केला. दरम्यान, संबंधित ठेकेदारावर कारवाई करून शहरातील सर्व अनधिकृत व धोकादायक होर्डिंग तात्काळ हटवावेत, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT