LPG Gas Black Market PUDHARI
कोल्हापूर

LPG Gas Black Market: कुरुंदवाडच्या गॅस एजन्सीचा काळाबाजार; अडीच हजाराला सिलेंडर विक्री, छाप्याची आधीच मिळते माहिती?

Anirudha Sankpal

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा

कुरुंदवाड शहरासह परिसरात घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या काळाबाजाराने पुन्हा डोके वर काढले असून, नृसिंहवाडीतून सर्रास बेकायदेशीर विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, या संदर्भात चौकशी करण्यासाठी संबंधित गॅस एजन्सीकडे संपर्क साधला असता चालक-मालकांकडून फोन उचलले जात नसून, लँडलाईन क्रमांकही बाजूला काढून ठेवण्यात आल्याने संपर्क पूर्णपणे खंडित झाला आहे. यामुळे नागरिकांत तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

अधिकृत दरापेक्षा दुप्पट रक्कम आकारली

कुरुंदवाड येथील एजन्सीच्या गॅस टाक्यांची नृसिंहवाडीतून मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारात विक्री होत असल्याचे उघड झाले आहे. अधिकृत दरापेक्षा दुप्पट रक्कम आकारत तब्बल अडीच हजार रुपयांपर्यंत एक सिलिंडर विकला जात आहे. नृसिंहवाडीत एका मोठ्या हॉटेलमध्ये सिलिंडर साठवणुकीचा अड्डा करण्यात आला आहे.

युद्धजन्य परिस्थिती, पुरवठ्यातील तुटवडा आदी कारणांचा आधार घेत काही एजन्सीकडून ग्राहकांची उघड आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. विशेषतः हॉटेल, ढाबे व लहान व्यावसायिकांना लक्ष्य करून हा काळाबाजार सुरू असल्याचे चित्र आहे.

छाप्याची आधीच मिळते माहिती?

पुरवठा विभागाकडून होणाऱ्या संभाव्य छापेमारीची माहिती संबंधित एजन्सींना आधीच मिळत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. त्यामुळे कारवाईपूर्वीच एजन्सी सावध होत असून, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे. या प्रकारामुळे महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नागरिकांनी या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने अचानक छापेमारी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि काळाबाजार करणाऱ्या एजन्सींचे परवाने तत्काळ रद्द करावेत, अशी जोरदार मागणी केली आहे.

संपर्क टाळण्याचा प्रकार संतापजनक

सिलिंडर काळाबाजाराबाबत माहिती घेण्यासाठी नागरिक व ग्राहकांनी संबंधित गॅस एजन्सीकडे वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, एजन्सी चालक-मालकांकडून फोन उचलले जात नसून, लँडलाईन क्रमांकही बाजूला ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे पारदर्शकतेचा अभाव दिसून येत असून, जबाबदारी टाळण्याचा हा प्रकार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT