कुरुंदवाड परिसराला वळवाच्या पावसाचा तडाखा, शिरढोणलाही झोडपले file photo
कोल्हापूर

कुरुंदवाड परिसराला वळवाच्या पावसाचा तडाखा, शिरढोणलाही झोडपले

उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा

पुढारी वृत्तसेवा

Kurundwad area hit by unseasonal heavy rains, Shirdhon also hit

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा

कुरुंदवाड शहर व परिसरात रविवारी सायंकाळी वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावत अक्षरशः धुमाकूळ घातला. दिवसभर उन्हाच्या तीव्र तडाख्यामुळे नागरिक हैराण झाले होते. तापमान ३८ ते ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. दुपारपर्यंत अंगाची लाहीलाही करणाऱ्या या उष्णतेनंतर सायंकाळी अचानक हवामानात बदल झाला.

सुमारे साडेचार वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. काही क्षणांतच जोरदार पावसाने हजेरी लावली आणि शहरासह परिसरात वळवाच्या पावसाचा थयथयाट सुरू झाला. सुमारे दोन तास सुरू असलेल्या या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले होते.

पावसानंतर शहरातील काही ठिकाणी गटारी तुटल्याचे दिसून आले. त्यामुळे साचलेले पाणी रस्त्यावर वाहू लागल्याने नागरिकांना काही प्रमाणात गैरसोयीला सामोरे जावे लागले. खिद्रापूर, राजापूर, राजापूरवाडी, टाकळी या भागांमध्ये पावसाने चांगलाच जोर धरला होता. दिवसभराच्या कडक उन्हामुळे तापलेले वातावरण या पावसामुळे पूर्णपणे गार झाले. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना या वळवाच्या पावसाने मोठा दिलासा मिळाला.

शिरढोणसह परिसराला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले

शिरढोण, टाकवडे, जांभळी व हरोली (ता. शिरोळ) परिसरात रविवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांनी जोरदार पावसाची हजेरी लावली. अचानक कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. दुपारपर्यंत कडक उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने दिलासा मिळाला.

गेल्या चार दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे जनजीवन त्रस्त झाले होते. सायंकाळी अचानक वातावरणात बदल होऊन आकाश ढगाळ झाले आणि काही वेळातच जोरदार पावसास सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटामुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. वादळी वाऱ्यांमुळे झाडांच्या फांद्या तुटण्याच्या घटना घडल्या, तर काही ठिकाणी किरकोळ नुकसानही झाले.

पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. काही भागात वीजपुरवठाही खंडित झाला. दरम्यान, या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा पसरला असून नागरिकांनी उकाड्यापासून दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT