हातकणंगले : गणाधिपती गणधर्याचार्य श्री कुंथुसागर महाराज यांच्या प्रेरणेतून उदयास आलेल्या श्रीक्षेत्र कुंथुगिरी क्षेत्राचा कोल्हापूरची श्री अंबाबाई व जोतिबा देवस्थानांच्या धर्तीवर विकास व्हावा, हे क्षेत्र एक आध्यात्मिक क्षेत्र म्हणून नावारूपास यावे यासाठी लागणारा निधी देणार असल्याची ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
कुंथुसागर महाराजांच्या 79 व्या जन्म जयंती निमित्ताने कुंथुगिरी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या 19 लाख रुपयांच्या देणगीतून उभारण्यात आलेल्या स्वागत कमानीचे उद्घाटन मंत्री आबिटकर यांच्या हस्ते झाले. खा.धैर्यशील माने म्हणाले, कुंथुसागर महाराजांच्या रूपाने ही भूमी पवित्र झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जैन आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून ललित गांधी यांना अध्यक्ष केले. जैन धर्म मानवता समजावून सांगतो.
माजी आ. प्रकाश आवाडे म्हणाले, श्री क्षेत्र कुंथुगिरी हे क्षेत्र फक्त जैन धर्मियांचे नाही तर संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाचे तीर्थक्षेत्र आहे. अन्न क्षेत्रासाठी तीन कोटींचा निधी यापूर्वी मिळाला आहे. आणखी 3 कोटी रुपये निधीची गरज आहे. तसेच सभा मंडपासाठक्ष पालकमंत्र्यांनी 12 कोटी रुपये द्यावेत.
गणाधिपती गणधराचार्य कुंथुसागर महाराज आशिर्वचनात म्हणाले, आपल्या जीवनात संयम, सदाचारण येत नाही तोपर्यंत माणवी जीवन सार्थक होत नाही. जीवन क्षणभंगुर आहे. कधी देह त्याग होईल याची शाश्वती नाही. प्रत्येकाला कर्माची फळ भोगावी लागतातच. परपिडा करू नका. प्राणीमात्राबरोबर मित्रत्वाची भावना ठेवा. चारित्र्य चांगले ठेवा. दुसर्याच्या जीवनात विनाकारण लक्ष देऊ नका.
कार्यक्रमास आ. विनय कोरे, आ. अशोक माने, आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खा. राजू शेट्टी, जि.प. माजी सदस्य अरुण इंगवले, उत्तम पाटील, ललित गांधी, आळतेचे सरपंच अजिंक्य इंगवले, शीतल हावळे, कैलास चांदिवाल, कुंतीलाल पाटणी, सुधीर पाटील, सुरेश मोघे, प्रांताधिकारी दीपक शिंदे, तहसीलदार सुशील बेल्हेकर, प्रसाद खोबरे, रवी रजपुते उपस्थित होते.