कुंभोज : येथे माल वाहतूक करणार्या ट्रकचा मुख्य रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी अचानक ब्रेक निकामी झाला. मात्र, ट्रकच्या पुढील चाकामध्ये मोटारसायकल अडकली अन् ट्रक थांबला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना रविवारी सकाळी 11 च्या सुमारास घडली.
ट्रक (क्र. एम.एच. 04 सीजी 7643) हरिपूरहून पेठवडगावकडे जात होता. कुंभोज येथील भरवस्तीत व वर्दळ असलेल्या दीपक चौकात ट्रक आल्यानंतर चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, ब्रेक लागला नाही. ट्रकचा ब्रेक व क्लच दोन्ही निकामी झाले होते. त्याचवेळी कुंभोज येथील कबिरा पांडव व अर्जुन पांडव मोटारसायकल (क्र. एम.एच. 09 एफ.आर. 9378) बाहेर काढत असताना ट्रकचे पुढील चाक मोटारसायकलवर गेल्याने मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले आहे.
मोटारसायकलस्वाराने तातडीने प्रसंगावधान राखत उडी मारल्याने त्याचा जीव वाचला. ट्रकच्या पुढील चाकामध्ये मोटारसायकल अडकली आणि ट्रक थांबला. रविवारी आठवडी बाजार असल्याने दीपक चौक येथे मोठ्या प्रमाणात गाड्यांची व नागरिकांची वर्दळ असते. ट्रकच्या पुढील चाकामध्ये दुचाकी अडकल्याने अनर्थ टळला. यावेळी कबिरा पांडव, सुशांत पांडव, नीलेश भंडारी, करण पांडव, सचिन लाटवडे, महेश कोळी यांनी परिश्रम घेऊन वाहतूक सुरळीत केली.