शिरढोण : राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानांतर्गत झालेल्या स्पर्धेत टाकवडे (ता.शिरोळ) येथील कुमार विद्यामंदिर या प्राथमिक शाळेने तालुक्यानंतर आता कोल्हापूर जिल्ह्यातही प्रथम क्रमांक पटकावला आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेय यांनी भेट देऊन मूल्यांकन केले होते. शाळेला तालुकास्तरीय प्रथम क्रमांक ३ लाख रूपये आणि जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक ११ लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
४५ दिवसांसाठी ही स्पर्धा राबविण्यात आली होती. शैक्षणिक गुणवता, आरोग्य तपासणी, आर्थिक साक्षरता, क्रीडा स्पर्धा, व्यक्तिमत्व विकासासह विविध उपक्रमांतील विद्यार्थी सहभाग, शाळा परिसराचे सौदर्यीकरण, प्लास्टिकमुक्त शाळा आदी निकषांची पूर्तता झाल्याने शाळेची प्रथम क्रमांकासाठी निवड झाली.
गटशिक्षणाधिकारी भारती कोळी, विस्तार अधिकारी दीपक कामत, अनिल ओमासे, केंद्रप्रमुख आण्णासो मुंडे आदीं शाळेचे मूल्यांकनासाठी उपस्थित होते. मुख्याध्यापक , अरुण कदम,नांदणी केंद्र प्रमुख व शिक्षक प्रकाश खोत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष इरफान मुल्ला, उपाध्यक्ष,गटप्रमुख अमोल चौगुले, सरपंच सविता मनोज चौगुले, उपसरपंच व सर्व सदस्य, शाळेचे शिक्षक अर्चना परीट, तुषार घाडगे,चंद्रकांत नाईक,अर्पणा परीट,मायाप्पा कांबळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष, पोलिसपाटील, ग्रामसेवक व सर्व पालक व ग्रामस्थ या सर्वांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.
ग्रामपंचायत प्रशासनाने शाळेमध्ये अनेक पायाभूत सुविधा पुरविल्या आहेत. सातत्याने शाळा व्यवस्थापन समिती मार्फत शाळेतील शिक्षकांशी समन्वय राखत शाळेच्या सर्वांगीण विकासात ग्रामपंचायतीने सक्रिय सहभाग घेतला आहे.त्यामुळेच शिक्षक व ग्रामपंचायतीच्या कष्टामुळेच गावच्या लौकिकात मानाचा तुरा रोवला गेला आहे.अमोल चौगुले, गटप्रमुख, टाकवडे ग्रामपंचायत