कुडाळ : कुडाळ नगरपंचायत हद्दीत व्यवसायासाठी आवश्यक ‘ना हरकत’ दाखला मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडे १२०० रुपये किमतीच्या खड्यासह चांदीची अंगठी मागितल्याप्रकरणी कुडाळ नगरपंचायतीचे स्वच्छता निरीक्षक पांडुरंग वासुदेव नाटेकर यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सापळा रचून ताब्यात घेतले. या कारवाईत नाटेकर यांनी तक्रारदाराकडून अंगठी स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. मात्र, कारवाईपूर्वी संशय आल्याने त्यांनी अंगठी लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधीक्षक संगीता पाटील यांनी दिली.
तक्रारदाराने ६ जुलै २०२६ रोजी कुडाळ नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांकडे ‘पद्मगड ज्वेलर्स’ या नावाने व्यवसाय सुरू करण्यासाठी ना हरकत दाखला मिळावा, यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर २७ ऑगस्ट रोजी तक्रारदार दाखला घेण्यासाठी नगरपंचायतीमध्ये गेले असता स्वच्छता निरीक्षक पांडुरंग नाटेकर यांनी तक्रारदाराकडे १२०० रुपये किमतीची नवीन खड्यासह चांदीची अंगठी मागितली. तक्रारदारांनी तशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.
या तक्रारीची २७ ऑगस्ट रोजी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यावेळी नाटेकर यांनी तक्रारदाराकडे सदर अंगठीची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शुक्रवार, ४ सप्टेंबर रोजी कुडाळ नगरपंचायत कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराने श्री. नाटेकर यांची भेट घेतली असता त्यांनी १२०० रुपये किमतीच्या खड्यासह चांदीसदृश धातूची अंगठी स्वीकारली. मात्र, नाटेकर यांना कारवाईचा संशय आल्याने त्यांनी अंगठी कुठेतरी लपवून ठेवली आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपास पथकाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, नाटेकर यांच्या हाताच्या बोटांवर अँथ्रोसिन पावडरचे स्पष्ट चिन्ह आढळून आले. त्यामुळे त्यांनी अंगठी स्वीकारल्याची खात्री झाली. त्यानंतर दुपारी २.३० वा.च्या सुमारास त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचेे पोलिस निरीक्षक दीपक माळी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.