कोल्हापूर : सोमवार संध्याकाळची वेळ... केएसबीपी चौक परिसरातील फुटपाथवर नेहमीप्रमाणे खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांभोवती ग्राहकांची गर्दी वाढू लागली होती. भेळ, पाणीपुरी, चाट आणि विविध नॉनव्हेज खाद्यपदार्थ विक्रीची लगबग सुरू असतानाच महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक पोलिस बंदोबस्तासह दाखल झाले आणि काही क्षणांतच परिसरातील वातावरण बदलले. ग्राहक बाजूला झाले, विक्रेत्यांची धावपळ सुरू झाली. महापालिकेने फेरीवाल्यावर धडक कारवाई सुरू केली, त्यावेळी अनेकांनी टेम्पो बोलावून स्वतःच आपल्या हातगाड्या हटविण्यास सुरुवात केली. त्यानंतर केएसबीपी चौकातील फूटपाथने मोकळा श्वास घेतला.
मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश रवींद्र घुगे यांनी नुकतेच शहरातील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाबाबत महापालिकेवर कडक ताशेरे ओढल्यानंतर सोमवारी (दि. १३) रात्री केएसबीपी चौक परिसरात ही धडक कारवाई करण्यात आली. आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार आणि उपआयुक्त किरणकुमार धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
३९ हातगाड्यांवर कारवाई
कारवाईदरम्यान एकूण ३९ हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी दोन हातगाड्या, स्टँड बोर्ड आणि अन्य साहित्य महापालिकेने जप्त केले, तर उर्वरित ३७ फेरीवाल्यांनी स्वतःहून हटविल्या. सायंकाळी सात ते रात्री दहापर्यंत तीन तास सुरू असलेल्या या मोहिमेमुळे संपूर्ण परिसरात एकच गडबड उडाली.
अनेकांनी स्वतःच हातगाड्या नेल्या
अनेक फेरीवाल्यांनी विक्रीसाठी तयार केलेले खाद्यपदार्थ तसेच ठेवून हातगाड्या हलविण्याला प्राधान्य दिले. काहींच्या चेहऱ्यावर उद्याच्या उदरनिर्वाहाची चिंता स्पष्ट दिसत होती, तर काहींनी कोणताही वाद न घालता प्रशासनाला सहकार्य करण्याचा मार्ग स्वीकारला. अनेकांनी टेम्पो मागवून स्वतःच हातगाड्या भरून नेल्या.
कारवाईनंतर केएसबीपी चौक ते राजाराम कॉलेजपर्यंतचा फुटपाथ अनेक दिवसांनी मोकळा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पादचाऱ्यांना चालण्यासाठी प्रशस्त जागा उपलब्ध झाली, तर वाहतूकही काही प्रमाणात सुरळीत होणार आहे. या मोहिमेत सहायक आयुक्त डॉ. विजय पाटील, उपशहर अभियंता अरुणकुमार गवळी, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, विभागीय कार्यालय क्रमांक ३ चे कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलिस दल सहभागी झाले होते.
अतिक्रमणांविरोधातील कारवाई यापुढे अधिक तीव्र
महापालिकेने स्पष्ट इशारा दिला असून शहरातील अनधिकृत फेरीवाले, रस्त्यांवरील शेड्स आणि अन्य अतिक्रमणांविरोधातील कारवाई यापुढे अधिक तीव्र केली जाणार आहे. संबंधितांनी स्वतःहून अतिक्रमणे हटवावीत, अन्यथा जप्त करण्यात आलेले साहित्य परत दिले जाणार नाही, असे महापालिकेने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.