Nrusinhwadi Datta Mandir submerged Pudhari Photo
कोल्हापूर

Kolhapur Rain Update: कृष्णेचा रौद्र अवतार: श्रीक्षेत्र नृसिंहवाडीचे दत्त मंदिर संपूर्ण पाण्याखाली

Nrusinhwadi Datta Mandir submerged: गेल्या २४ तासांत कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत तब्बल १२ फुटांनी वाढ झाली आहे त्यामुळे दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे

पुढारी वृत्तसेवा

नृसिंहवाडी : दत्त संप्रदायाचे प्रमुख तीर्थक्षेत्र आणि 'दत्त राजधानी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडीत पूरस्थिती गंभीर बनली आहे. गेल्या २४ तासांत कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत तब्बल १२ फुटांनी वाढ झाल्याने, येथील प्रसिद्ध दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच मंदिराने जलसमाधी घेतल्याने भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, कृष्णामाईचा प्रकोप शांत व्हावा यासाठी प्रार्थना केली जात आहे.

प्रशासनाकडून तातडीची पाऊले

पुराचा धोका लक्षात घेता श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवस्थान समितीने अत्यंत सतर्कतेने पाऊले उचलली आहेत. मंदिरातील मौल्यवान वस्तू, पूजेचे साहित्य आणि इतर महत्त्वपूर्ण सामान सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. भगवान दत्तात्रयांच्या स्वयंभू पादुका पाण्याखाली असल्याने, भाविकांच्या दर्शनासाठी श्रींची उत्सवमूर्ती जवळच्या नारायणस्वामी मठात स्थापित करण्यात आली आहे. दर्शनाची सोय तेथेच करण्यात आली आहे. नृसिंहवाडी गावातील सखल भागांमध्ये पुराचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली असून, प्रशासनाने नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे.

पावसाची विश्रांती, पण धोका कायम

आज सकाळपासून पावसाने काहीशी उसंत घेतली असली तरी धोका टळलेला नाही. विविध धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरूच असल्याने नद्यांची पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नृसिंहवाडीत पूरस्थिती गंभीर असून, प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. एकीकडे भाविक श्रद्धेने कृष्णामाईला शांत होण्याचे साकडे घालत आहेत, तर दुसरीकडे संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा खंबीरपणे उभी आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT