नृसिंहवाडी : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील प्रसिद्ध श्री दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात पुराचे पाणी शिरले आहे. यावर्षी पहिल्यांदाच मंदिराच्या गाभाऱ्याच्या पहिल्या पायरीला पाण्याने स्पर्श केला आहे. पूरस्थिती असूनही, भाविकांच्या श्रद्धेत जराही कमतरता आलेली नाही. कमरेइतक्या पाण्यात उभे राहून भाविक श्री दत्त महाराजांचे दर्शन घेत आहे.
सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी २८ फुटांवर पोहोचली असून, पावसाची रिपरिप सुरूच आहे. पुराचे पाणी मंदिर परिसरात आणि गाभाऱ्यात शिरल्याने एकीकडे चिंताजनक परिस्थिती असली तरी, दुसरीकडे भाविकांचा उत्साह कायम आहे. दिवसभर भाविकांनी पुराच्या पाण्यातूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. पाण्यात भिजत, नतमस्तक होत भाविक दर्शन घेत असल्याचे भावुक चित्र पाहायला मिळाले.
रात्री उशिरापर्यंत पाण्याची पातळी आणखी वाढून श्री दत्त महाराजांच्या मनोहर पादुकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. असे झाल्यास, मंदिरात ‘दक्षिणद्वार सोहळा’ पार पडेल, अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांमध्ये मोठी उत्सुकता असते. त्यामुळे प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.