आशिष ल. पाटील
गुडाळ : कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदांची निवड सोमवारी (दि.७) होणार आहे. सत्तारूढ आघाडीच्या अंतर्गत ठरलेल्या धोरणानुसार यावर्षी सभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणार आहे.
मात्र, या पदावर आपल्याच गटाच्या समर्थकाची वर्णी लागावी, यासाठी माजी आमदार के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील या ‘मेव्हणे-पाहुण्यां’मध्ये राजकीय शह-काटशह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
रविवारी (दि. ६) केडीसी बँक मुख्यालयात सत्तारूढ आघाडीच्या प्रमुखांची बैठक होणार असून, त्यात पदाधिकाऱ्यांची नावे निश्चित केली जाणार आहेत. त्यामुळे हे पद राधानगरी तालुक्याला, भुदरगड तालुक्याला की वादाचा फायदा घेत कागल तालुक्यातील 'सूर्य' बाजार समितीत उगवणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
बाजार समितीवर सत्ताधारी आघाडीमध्ये ना. हसन मुश्रीफ, ना. प्रकाश आबिटकर, आ. सतेज पाटील, आ. विनय कोरे, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे, आणि राहुल पीएन पाटील या सर्वपक्षीय नेत्यांची सत्ता आहे. या आघाडीत पहिल्या वर्षी सभापतीपद काँग्रेसला, दुसऱ्या वर्षी जनसुराज्य पक्षाला मिळाले होते. यंदा राष्ट्रवादी काँग्रेसला हे पद मिळणार असून, या पक्षाचे एकूण सहा संचालक आहेत. त्यात हसन मुश्रीफ यांचे एक, के.पी. समर्थक तीन, आणि ए.वाय. समर्थक एक, मानसिंगराव गायकवाड समर्थक एक असे सहा संचालक आहेत.
बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीपासून के.पी. आणि ए.वाय. यांच्यातील दुरावा वाढला आहे. विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्याने त्यांचे संबंध अधिक ताणले गेले. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर गेलेले ए.वाय. पाटील सध्या पक्षप्रमुख अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत असून, आपले समर्थक शिवाजीराव पाटील (तारळेकर) यांना सभापतीपद मिळावे यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
के.पी. पाटील यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले ना. प्रकाश आबिटकर यांना मंत्रिपद आणि पालकमंत्रीपद मिळाल्याने त्यांची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महायुतीत एकत्र असूनही, आगामी तालुका पातळीवरील निवडणुकांमध्ये त्यांच्यातील संघर्ष अटळ असल्याचे संकेत आहेत.
के.पी. पाटील यांनी भुदरगड तालुक्यातील आपल्या समर्थकांपैकी शेखर देसाई किंवा सौ. मेघा देसाई यांना सभापती पद मिळावे, अशी भूमिका घेतली आहे. यामागे ए.वाय. यांना शह देण्याबरोबरच तालुक्यातील आगामी निवडणुकांसाठी राजकीय बळ निर्माण करण्याचा हेतू आहे.
आता अंतिम निर्णय ना. हसन मुश्रीफ यांच्या हातात असून, राधानगरीतील ए.वाय. समर्थक, भुदरगडमधील के.पी. समर्थक, की वादाचा फायदा घेत कागल तालुक्यातील सूर्यकांत पाटील अशा तिघांमध्ये हे महत्त्वाचे पद कुणाच्या पदरी पडणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सभापती कोणत्या तालुक्यात यावर उपसभापती पदाचे नाव निश्चित होणार आहे.