Kolhapur Kothali Water Crisis
जयसिंगपूर : कोथळी (ता. शिरोळ) येथील वारणा नदीचे पात्र अचानक कोरडे पडल्याने गंभीर जलसंकट निर्माण झाले आहे. कोथळी बंधाऱ्यावरून सुरू असलेल्या अनेक गावांच्या नळ पाणीपुरवठा योजना पूर्णपणे बंद पडल्या असून, परिसरातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. तसेच कडक ऊन आणि शेतीसाठी पाण्याची वाढती गरज असताना नदीचे पात्र कोरडे पडल्याने पिके वाळण्याची भीती व्यक्त होत असून शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
कोथळी बंधाऱ्यावरून कोथळी, उमळवाड, चिपरी, निमशिरगाव, जैनापूर, तारदाळ, यड्राव या प्रमुख गावांसह तारदाळ इंडस्ट्रिअल इस्टेटचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. मात्र, गेल्या चार दिवसांपासून या बंधाऱ्यालगत नदीचे पात्र कोरडे ठाक पडले आहे. त्यामुळे या सर्वच ठिकाणच्या पाणी योजनांच्या विहिरी आणि जॅकवेल कोरड्या पडल्या आहेत. पाण्याचा उपसा पूर्णपणे थांबल्याने पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीचे विद्युत पंपही बंद पडले आहेत. ऐन गरजेच्या वेळी पाणी नसल्याने शिरोळ आणि हातकणंगले या दोन्ही तालुक्यांतील नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू असून संताप व्यक्त केला जात आहे.
या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वारणा नदीवरील चांदोली धरणातून तत्काळ नदीपात्रात पाणी सोडावे, अशी आक्रमक मागणी शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
वारणा नदीवरील चांदोली धरणातून १,१०० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हे पाणी वारणा नदीचा शेवटचा बंधारा असलेल्या कोथळी येथे पुढील दोन दिवसांत दाखल होईल. त्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत होईल- व्ही. जी. कोळेकर, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग