कोल्हापूर

Online Game Death | कोरोचीत ऑनलाईन गेममुळे युवकाचा बळी

कर्जाच्या नैराश्यातून जीवन संपवले ; ​सुसाईड नोटमध्ये आर्थिक नुकसानीचा

पुढारी वृत्तसेवा

​ यड्राव : हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथे ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे हरल्याच्या नैराश्यातून युवकाने गळफास घेऊन जीवन संपवले. अदित्य मिलिंद कोळी (वय २४) असे त्याचे नाव आहे. त्याने मृत्यूपूर्वी लिहीलेली सुसाईड नोट पोलिसांना घटनास्थळी मिळून आली आहे. ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनाने युवकाने टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

​ अदित्य याने शनिवारी (दि.१८) सायंकाळी घरातील सदस्य कामात असताना वरच्या मजल्यावरील खोलीतील लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन जीवन संपवले. ​या घटनेची वर्दी चुलत भाऊ भालचंद्र संजय कोळी यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिली. घटनास्थळाच्या पंचनाम्यामध्ये जीवन संपवण्यापूर्वी आदित्यने लिहिलेली एक चिठ्ठी मिळून आली. त्यामध्ये त्याने आपल्याला ऑनलाईन गेमिंगचा नाद लागल्याचे आणि त्यामध्ये लावलेले पैसे हरल्यामुळे आपण हे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले आहे.

वर्षभरापूर्वीच अदित्यच्या वडिलांचे छत्र हरपले होते. घरी आई, लहान बहीण व आदित्य असे तिघेजण राहत होते. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर असतानाच, ऑनलाईन गेमिंगच्या जाळ्यात अडकल्याने आदित्यने आयुष्य संपवल्याने कोळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अदित्य हा मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने परिसरात त्याचा मोठा मित्रपरिवार होता. मात्र, ऑनलाईन गेमिंगच्या छुप्या व्यसनाने त्याचा बळी घेतल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. तपास सहाय्यक फौजदार सुवर्णा गायकवाड करीत आहेत.

अदित्य यांने मोबाईलवर ऑनलाइन गेमिंगचे ॲप डाऊनलोड करून प्रथम दहा हजार रुपये घालवले. त्यानंतर मित्रांकडून पैसे घेऊन तेही हरला. मोबाईल 35 हजार रुपयेला विकून गेम खेळला. त्यानंतर 80 हजार रुपये इतर ठिकाणाहून घेऊन खेळात घालवले. कर्जबाजारी पणाच्या नैराशातून त्यांने आपले जीवन संपविले. याला कोणास जबाबदार धरू नये असेही त्याने चिठ्ठीत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT