Kopeshwar Temple: कोपेश्वर मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट करा; मजबुतीकरणासाठी निधी देऊ Pudhari
कोल्हापूर

Kopeshwar Temple: कोपेश्वर मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट करा; मजबुतीकरणासाठी निधी देऊ

‌‘सार्वजनिक बांधकाम‌’च्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर

पुढारी वृत्तसेवा

कुरुंदवाड : ऐतिहासिक आणि वास्तुकलेचा अजोड नमुना असलेल्या खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील श्री क्षेत्र कोपेश्वर मंदिराचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करा, असे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी रविवारी दिले.

कोपेश्वर मंदिराला भेट दिल्यानंतर त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. मंदिराच्या दुरवस्थेबाबत चिंता व्यक्त करत, या ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

वास्तुकलेचे जतन, ही शासनाची जबाबदारी

पाहणीदरम्यान मुख्य मंदिर आणि वैशिष्ट्यपूर्ण स्वर्गमंडप यांची होत असलेली पडझड म्हैसकर यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. मंदिराची सद्यस्थिती पाहता पुढील महिन्यात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक बोलावण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले, तसेच मंदिराचे तांत्रिक व स्ट्रक्चरल ऑडिट करून मजबुतीकरणासाठी आवश्यक निधी प्राधान्याने उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. हे मंदिर केवळ धार्मिक केंद्र नसून महाराष्ट्राचा अमूल्य ऐतिहासिक ठेवा आहे. त्याचे रक्षण करणे ही शासनाची नैतिक जबाबदारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी सरपंच सारिका कदम, माजी उपसरपंच पूजा खानोरे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे शिवराज नायकवडी, सुयश पाटील, रस्ते विकास महामंडळाचे समाधान पाटील, सुधाकर कुंभोजे, दयानंद खानोरे, अशपाक ढलाईत, रामगोंडा पाटील, संदीप सलगर, दिलीप गुरव, राजू गुरव, आप्पासाहेब कुरुंदवाडे, दीपक पोतदार आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT