जमीर पठाण
कुरुंदवाड : खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील कोपेश्वर मंदिराच्या संरचनात्मक दुरुस्ती तसेच मंदिर परिसरातील अतिक्रमणप्रकरणी न्यायालयाने प्रशासनाच्या दिरंगाईबाबत तीव— नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकारी, ग्रामपंचायत आणि पोलिस अधिकार्यांना 22 तारखेपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तसेच पुरातत्त्व विभागाने नियोजन प्राधिकरण व स्थानिक प्रशासनाला पाठविलेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती न्यायालयात दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
कोपेश्वर मंदिर परिसरातील अतिक्रमणाबाबत दाखल याचिकेवर शुक्रवारी कोल्हापूर सर्किट बेंचसमोर सुनावणी झाली. यावेळी अॅड. युवराज नरवणकर यांनी मंदिराभोवतालचा परिसर संरक्षित असतानाही काही ठिकाणी अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले.
यावर पुरातत्त्व खात्याने जिल्हाधिकारी कार्यालय पोलिस व ग्रामपंचायत प्रशासनाची अतिक्रमण हटवण्याबाबत पत्रव्यवहार करून देखील स्थानिक प्रशासनाकडून कोणतीच कारवाई झाली नसल्याचा युक्तिवाद केला. याची गंभीर दखल घेत न्यायालयाने अतिक्रमणप्रकरणी नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकारी, ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनाला स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले, तर भारतीय पुरातत्त्व खात्याचे महासंचालकांना 22 तारखेपर्यंत अंतिम निर्णय घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामपंचायतला स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिल्याने ग्रामपंचायत प्रशासन सर्किट बेंचच्या रडारवर आले आहे.