कोल्हापूर : बनावट दारूनिर्मिती करणार्‍या कोंडिग्रे (ता. शिरोळ) येथील कारखान्याचा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर भरारी पथकाने पर्दाफाश केला. संशयितांच्या मुसक्या आवळत त्यांच्यावर अटकेची कारवाई केली.  (छाया : पप्पू अत्तार)
कोल्हापूर

fake liquor factory raid | कोंडिग्रेतील बनावट दारूनिर्मिती कारखान्यावर छापा; तिघांना बेड्या

सांगलीतील सराईत तस्कराचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोंडिग्रे (ता. शिरोळ) येथील बनावट दारूनिर्मिती करणार्‍या कारखान्याचा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शनिवारी भांडाफोड केला. कोंडिग्रे येथील शेतात शेडवर छापा टाकून पथकाने सुमारे 2 लाख 25 हजार रुपये किमतीच्या बनावट दारूने भरलेल्या 375 बाटल्या व तीन मोटारी, असा एकूण 16 लाख 95 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी मुख्य संशयित दत्तात्रय भीमराव बंडगर (वय 49, रा. हनुमान मंदिरजवळ, संजयनगर, सांगली), अवधूत राजेंद्र पिसे (30, महादेव मंदिरजवळ, पिसे गल्ली, दानोळी, ता. शिरोळ), संतोष कुमार कांबळे (30, कोंडिग्रे, ता. शिरोळ) या तिघांना बेड्या ठोकल्या. दरम्यान, दत्तात्रय बंडगर हा सराईत गुन्हेगार असून, त्याला यापूर्वी दारू तस्करीप्रकरणी अटक झाली होती. राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे, उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने ही कारवाई केली.

बनावट दारू गोव्याची; बाटल्या विविध ब्रँडच्या!

संशयित दत्तात्रय बंडगर, अवधूत पिसे, संतोष कांबळे हे गोव्यातील म्हापसा येथून गोवा बनावटीची दारू कोंडिग्रे येथे आणून महाराष्ट्रातील विविध ब्रँडच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भरून सर्रासपणे विक्री करीत होते. सुमारे दीड वर्षापासून हा गोरख धंदा सुरू होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाला याची माहिती मिळताच भरारी पथकाने कोंडिग्रे (ता. शिरोळ) येथील शेतात असलेल्या पत्र्याच्या शेडवर छापा टाकून बनावट दारू कारखान्याचा पर्दाफाश केला.

संशयितांकडून विदेशी मद्याच्या विविध ब्रँडच्या सीलबंद बाटल्या, बनावट बूच लावलेल्या बाटल्या, भेसळ दारूने भरलेल्या 375 बाटल्या, असा 2 लाख 25 हजार रुपये किमतीचा दारूसाठा, तीन मोटारी असा एकूण 16 लाख 95 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे अधीक्षक स्नेहलता नरवणे, उपअधीक्षक शिंदे यांनी सांगितले.

रॅकेटमध्ये गोव्यासह जिल्ह्यातील तस्कर सक्रिय : अधीक्षक नरवणे

बनावट दारूनिर्मिती करणार्‍या या रॅकेटमध्ये गोव्यासह कोल्हापुरातील आणखी काही संशयित सक्रिय असल्याची माहिती आहे. संबंधितांना लवकरच अटक करण्यात येईल, असे अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी सांगितले. यावेळी छापा टाकलेल्या पथकातील निरीक्षक सदानंद मस्करे, अभयकुमार साबळे, अजय वाघमारे, कांचन सरगर हे उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT