कोल्हापूर : गेल्या अनेक वर्षांपासून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण रेल्वेने जोडण्याचे स्वप्न अखेर सत्यात उतरणार आहे. गेल्या नऊ वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाच्या कामाला पुढील वर्षी 2027 साली प्रारंभ होणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी केलेल्या तरतुदीपैकी 30 हजार कोटी रुपये महाराष्ट्राला मिळणार आहेत. त्यातून कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाला केंद्र शासनाचा हिस्सा असलेल्या 3 हजार 411 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद होणार आहे. त्यासह राज्य शासनही आपला हिस्सा तत्काळ देणार असून लवकरच या मार्गाच्या भूसंपादनाला सुरुवात होणार आहे.
कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडावे ही गेल्या 40 वर्षांपासूनची मागणी होती. 25 फेब्रुवारी 2016 रोजी रेल्वे अर्थसंकल्पात तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी 3 हजार 244 कोटींच्या या मार्गाला मंजुरी देत निधीचीही तरतूद केली. केंद्र आणि राज्य शासनाच्या हिस्सेदारीतून हा प्रकल्प उभारला जाईल, असे त्यावेळी स्पष्ट करण्यात आले होते. यानंतर या मार्गाचे सर्व्हेक्षण, डीपीआर, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आदी विविध प्रक्रिया पूर्ण झाल्या. मात्र, याकरिता तब्बल पावणेदहा वर्षांचा कालावधी गेला. केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2 लाख 55 हजार 445 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून महाराष्ट्राच्या रेल्वे विकासासाठी विविध कामांकरिता एकूण 30 हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
कोल्हापूर-वैभववाडी या मार्गाला मंजुरी देताना 2016 साली त्याचा खर्च मार्गाचा 3 हजार 244 कोटी होता. यानंतर केंद्र व राज्य शासन यांच्या 50-50 टक्के भागीदारीतून होणार्या या प्रकल्पासाठी 2017 मध्ये 3 हजार 838 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर प्रकल्प रखडला. गेल्या पावणेदहा वर्षांत या प्रकल्पाचा खर्च जवळपास दुप्पट म्हणजे 6 हजार 300 कोटींवर गेला आहे.
या प्रकल्पासाठी केंद्र शासन आपला हिस्सा 3 हजार 411 कोटी रुपये देणार आहे. नव्या रेल्वे मार्गासाठी एकूण 32 हजार 235 रुपये खर्च होणार आहेत. त्यात या प्रकल्पाचाही समावेश आहे. राज्य शासनही आपला हिस्सा 2 हजार 889 कोटी रुपयेही तत्काळ उपलब्ध करून देणार आहे.
या प्रकल्पासाठी एकूण 638.6 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. या भूसंपादनासाठी 1200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हे भूसंपादन जिल्हानिहाय केले जाणार असून त्यालाही लवकरच प्रारंभ होणार आहे.
11 डिसेंबर 2025 रोजी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधान भवनातील मंत्री परिषद सभागृहात बंदरे विकास विभागाचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली होत. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जयगड, आंग्रे, रेडी व विजयवाडा बंदरांचा विकास करण्यासाठी वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वेमार्ग तयार करावा. या मार्गासाठी राज्य शासनाच्या आर्थिक सहभागाची तरतूद करण्यात यावी. या मार्गासाठी भूसंपादन सुरू करावे, असे आदेशही दिले होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, पन्हाळा, गगनबावडा या तालुक्यांतून आणि कोकणातील वैभववाडी तालुक्यातून जाणारा हा मार्ग निसर्गाच्या कुशीतून जाणार आहे. या मार्गावर 28 कि.मी. लांबीचे एकूण 27 बोगदे असतील. सर्वात मोठा बोगदा 3.96 कि.मी. लांबीचा आहे. 2 कि.मी.पेक्षा जादा लांबीचे 3 तर त्यापेक्षा कमी लांबीचे 24 बोगदे असतील. या मार्गावर रस्त्यावरील 55 उड्डाणपूल, रस्त्याखालील 68 पूल असतील. यासह छोटे पूल 74 तर मोठे पूल 55 असतील. या मार्गावर एकूण दहा स्थानकेही प्रस्तावित आहेत.
कोल्हापूर-वैभववाडी या रेल्वेमार्गााठी तरतूद करण्यात आली आहे. यामुळे अनेक वर्षांपासूनचे हे स्वप्न सत्यात उतरत आहे. यामध्ये दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे मोठे योगदान आहे. या मार्गासाठी डॉ. जाधव यांनी दीर्घकाळ पाठपुरावा केला. चार दशकांची पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणवासीयांची ही जिव्हाळ्याची मागणी तडीस नेण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
दै. ‘पुढारी’चा 3 जानेवारी 2015 रोजी कोल्हापुरात अमृतमहोत्सवी सोहळा झाला. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू उपस्थित होते. या सोहळ्यात डॉ. जाधव यांनी कोल्हापूर-वैभववाडी या रेल्वेमार्गाला मंजुरी देण्याची मागणी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली होती. त्याचवेळी प्रभू यांनी या मार्गाची घोषणा केली.
यानंतर 25 फेब्रुवारी 2016 रोजी रेल्वे अर्थसंकल्पात 3 हजार 244 कोटी रुपयांच्या या मार्गाला मंजुरी दिली. त्यातील केंद्र शासनाच्या हिश्श्याच्या 1375 कोटी रुपयांचीही तरतूदही केली होती. यानंतरही डॉ. जाधव यांनी सातत्याने या मार्गाबाबत पाठपुरावा सुरूच होता. अखेर हा मार्ग आता साकारणार आहे.