कोल्हापूर : कोल्हापूरचा तिसरा विकास आराखडा हा केवळ नकाशा नसून शहराच्या भवितव्याची दिशा ठरवणारा महत्त्वाचा दस्तावेज आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक भागाच्या गरजा लक्षात घेऊन नागरिक आणि विविध संस्थांनी आपल्या सूचना लेखी स्वरूपात आठवडाभरात महापालिकेकडे सादर कराव्यात, असे आवाहन आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी केले.
दरम्यान, विकास आराखड्यात शहराच्या भविष्यातील गरजा आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबींचा समावेश करावा, अशी मागणी शहरातील विविध संस्था आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी केली. क्रीडांगणे, रस्ते रुंदीकरण, वाहतूक व्यवस्था, सायबर सुरक्षा, आधुनिक पायाभूत सुविधा आणि पर्यटन विकासाला प्राधान्य देण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.
आयुक्त डॉ. भारूड यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत विविध संस्था-संघटनांच्या पदाधिकार्यांची बैठक झाली. विकास आराखड्याच्या सहायक संचालिका सारिका बोधनकर, क्रेडाईचे अध्यक्ष के. पी. खोत, कोल्हापूर फर्स्टचे सुरेंद्र जैन, हॉटेल असोसिएशनचे सचिन शानभाग, चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष अजित कोठारी, चंदन मिरजकर, प्रकाश देवलापूरकर, धनंजय दुग्गे, अभिजित घाटगे यांच्यासह क्रेडाई, आयटी आणि आर्किटेक्ट असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आरक्षित जागा नागरी सुविधांसाठी महत्त्वाच्या
बैठकीत बोधनकर यांनी शहरातील पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, रस्ते आणि पाणीपुरवठा यासंदर्भातील नियोजन स्पष्ट केले. तसेच विकास आराखड्यात कोणत्या बाबींचा समावेश असावा, याबाबत प्रश्नावली भरून सूचना देण्याचे आवाहन केले. शहरातील आरक्षित जागा नागरी सुविधांसाठी महत्त्वाच्या असून, दुसर्या विकास आराखड्यातील क्रीडांगणांसाठी आरक्षित असलेल्या जागा अद्याप ताब्यात घेण्यात आलेल्या नाहीत. त्या जागा तातडीने ताब्यात घेऊन क्रीडांगणे विकसित करावीत, उपनगरांमधील आरक्षित जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी क्रीडांगणे व स्मशानभूमी यांसारख्या मूलभूत सुविधा निर्माण कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
रस्त्यांचे जाळे सक्षम करा...
कोल्हापूरला ग्रीन सिटीकडे घेऊन जाण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधा आवश्यक आहेत. टेलिमेडिसिन, स्पोर्टस् झोन, सायबर सिक्युरिटी, ई-गव्हर्नन्स यांसारख्या सुविधांचा समावेश करण्याबरोबरच शहरातील अतिक्रमणे रोखण्यासाठी ठोस नियोजन करावे. शहरात येणार्या आणि बाहेर जाणार्या रस्त्यांचे जाळे अधिक सक्षम नियोजन करावे, अशी सूचना उपस्थितांनी मांडली.
ड्रोन अन् जीआय मॅपिंगचा वापर
नव्या विकास आराखड्यात ड्रोन तंत्रज्ञान आणि जीआय मॅपिंगचा वापर करण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे जागांचे अचूक मोजमाप आणि नियोजन करणे शक्य होणार असल्याचे आयुक्त डॉ. भारूड यांनी स्पष्ट केले. तसेच ड्रेनेज पाईपलाईनचे योग्य आणि शास्त्रीय पद्धतीने डिझाईन करून त्याचा विकास आराखड्यात समावेश करण्याची गरजही बैठकीत व्यक्त केली.