सागर यादव
कोल्हापूर : देशाच्या स्वातंत्र्यासाठी छत्रपती चिमासाहेब महाराज यांच्या नेतृत्वाखाली इसवी सन 1857 मध्ये झालेल्या सशस्त्र लढ्याच्या साक्षीदार असलेल्या ऐतिहासिक वास्तूंवर दुर्लक्ष झाल्याने त्यांची पडझड झाली आहे. त्यांच्या जतन, संवर्धन आणि संरक्षणासाठी तातडीने प्रयत्न न झाल्यास त्या इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहेत.
फिरंगोजी शिंदे व त्यांच्या सहकार्यांनी इंग्रजांचा खजिना लुटून अधिकार्यांवर हल्ले केले. जुना राजवाड्यावरचा इंग्रजांचा ध्वज (युनियन जॅक) काढून तेथे स्वराज्याचा भगवा फडकवून दि. 31 जुलै 1857 रोजी कोल्हापूरला स्वतंत्र घोषित केले. स्वातंत्र्याची ही ठिणगी इंग्रज अधिकारी कर्नल जेकब याने आपल्या प्रचंड सैन्यांसह दडपली. दि. 5 डिसेंबर 1857 रोजी जुन्या राजवाड्यावर प्रचंड हल्ला केला. पारंपरिक शस्त्रांनी लढणारे स्वातंत्र्यसैनिक इंग्रजांच्या आधुनिक शस्त्रांपुढे फार काळ टिकले नाहीत. क्रांतिकारकांना पकडून फासावर लटकवून, तोफेच्या तोंडी देऊन आणि गोळ्या घालून ठार केले.
1857 च्या पाऊलखुणा दुर्लक्षित
1857 च्या प्रेरणादायी स्वातंत्र्यलढ्याच्या साक्षीदार असणारा जुना राजवाडा, मंगळवारपेठेतील पद्माळा तलाव परिसरातील राधाकृष्ण मंदिर आणि गिरगाव येथील गढी (लहान किल्ला) या वास्तू आजही आपले अस्तित्व टिकवून उभ्या आहेत. मात्र, त्यांच्या जतनासाठी कोणतेही प्रयत्न होत नसल्याचे वास्तव आहे. गिरगाव येथील फिरंगोजी शिंदे यांची गढी पूर्णपणे ढासळली आहे. तर फिरंगोजी शिंदे यांच्या स्मारकाला देखभाल-दुरुस्तीअभावी अवकळा आली आहे. राधाकृष्ण मंदिर नागरवस्तीच्या गराड्यात बंदिस्त झाले आहे. जुन्या राजवाड्यावर स्वातंत्र्यलढ्याची माहिती सांगणारे फलक किंवा लाईट अँड साऊंड शो सारख्या गोष्टींची अत्यावश्यकता आहे. आज कोल्हापुरात विविध स्मारकांच्या सुशोभीकरणावर लाखो रुपयांचा अनावश्यक खर्च होत असताना, खरी स्मारके मात्र दुर्लक्षित राहिल्याचे वास्तव आहे.
पाकिस्तानातील स्मारकासाठी राजर्षी यांचे प्रयत्न
1857 च्या सशस्त्र लढ्याचे आश्रयदाते छत्रपती चिमासाहेब महाराजांना रातोरात कैद करून रत्नागिरीतून समुद्रमार्गे कराची (सध्याचे पाकिस्तान) येथे नेले. तेथे 11 वर्षांच्या कैदेनंतर त्यांचा मृत्यू झाला (15 मे 1869). करवीर छत्रपतींच्या वतीने चिमासाहेबांची समाधी बांधून पुण्यतिथी, जयंतीचे सोहळे साजरे केले जात असत. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कराचीत जाऊन चिमासाहेबांचे यथायोग्य स्मारक उभारण्यासाठी बांधकाम अभियंत्यांकडून विशेष आराखडा तयार करून घेतला होता. या आराखड्यासाठी 5 हजार 481 रुपयांचा प्राथमिक निधी मंजूर केला होता (दि. 14 ऑगस्ट 1916). मात्र, पुढच्या पाच-सात वर्षांतच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे निधन झाल्याने त्यांचे हे स्वप्न अपुरे राहिले.